दापोलीच्या सभापती पदी उन्मेष राजे, तर गुहागरची धुरा प्रणव पोळेकर यांच्याकडे; रत्नागिरीतील नव्या दमाच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

रत्नागिरी: आगामी पंचायत समिती निवडीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली असून यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, या पदांचा कार्यकाळ हा सव्वा वर्षांचा निश्चित करण्यात आला आहे. पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांना प्राधान्य देण्याचे धोरण पक्षाने अवलंबले आहे.

जिल्हयातील विविध तालुक्यांसाठी जाहीर झालेली नावे खालीलप्रमाणे आहेत:

मंडणगड पंचायत समितीच्या सभापती पदासाठी प्रणाली संदेश चिले तर उपसभापती पदासाठी दिपक शंकर मालुसरे यांची निवड करण्यात आली आहे.

खेडमध्ये आफिया नजीब पालेकर सभापती म्हणून तर सुनिल बाबाराम मोरे उपसभापती म्हणून कार्यभार पाहतील.

दापोली तालुक्याची धुरा सभापती म्हणून उन्मेष रामचंद्र राजे आणि उपसभापती म्हणून नम्रता प्रदिप तोडणकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

चिपळूणमध्ये संदेश मनोहर आयरे आणि गुहागरमध्ये प्रणव प्रमोद पोळेकर यांची सभापती पदासाठी वर्णी लागली आहे.

देवरुख (संगमेश्वर) पंचायत समितीच्या सभापती म्हणून शर्वरी प्रथमेश वेल्ये कामकाज पाहतील.

जिल्ह्याचे मुख्य केंद्र असलेल्या रत्नागिरीत प्रविण धोंडू पांचाळ यांची सभापती पदी, तर गजानन धर्माजी धनावडे यांची उपसभापती पदी निवड झाली आहे.

दक्षिण रत्नागिरीतील राजापूर तालुक्यासाठी नंदिनी नितिन कदम यांची सभापती आणि अभिजित यशवंत गुरव यांची उपसभापती म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

तसेच लांजा तालुक्यात मानसी सिध्देश्वर आंबेकर सभापती तर आदेश दत्तात्रय आंबोळकर उपसभापती म्हणून जबाबदारी सांभाळतील.

पक्षाच्या आदेशानुसार ही सर्व पदे सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहेत. उद्या होणाऱ्या अधिकृत निवडीनंतर हे सर्व नवनियुक्त पदाधिकारी आपला पदभार स्वीकारतील.

या निवडीमुळे जिल्हयातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Table

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*