रत्नागिरी – राजा कसा असावा, सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय कसा देत होता, जातीय सलोखा कसा राखत होता. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सर्व घटकांना घेऊन कशा पध्दतीने पुढे जात होता, याचे आदर्श उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. याची प्रेरणा या शिवसृष्टीमधून पिढ्यानपिढ्या मिळत राहील, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.

रत्नदूर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी भाग-2 चे लोकार्पण हजारो शिवप्रेमींच्या साक्षीने ढोल, ताशे, तुतारीच्या निनादात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि महाराजांच्या जयघोषात उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते काल रात्री झाले.
यावेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार यावेळी म्हणाले, तिथीप्रमाणे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो.

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमाखदार पुतळा उभा आहे. सरखेल कान्होजी आंग्रे, तानाजी मालुसरे यांचे पुतळेही उभे करण्यात आले आहेत.
ज्या किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी असेल, जिथे राज्यभिषेक झाला तो रायगड असेल, शौर्याची साक्ष देणारा प्रतापगड अशा अनेक महत्त्वाच्या किल्ल्यांचा जीर्णोध्दार करण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे.
इतिहास काय असावा, राजा कसा असावा, सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय कसा देत होता, लोकांना लक्षात राहिले पाहिजे.

हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सगळ्या घटकांना घेऊन पुढे जाणाऱ्या आदर्श राजाचे उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत.
ही शिवसृष्टी पाहून मी भारावून गेलो आहे. विकास कामाला पैसे सर्वांना मिळत असतात. पण, त्या दर्जाचे विकास काम व्हावे लागते आणि असे उत्तम काम पालकमंत्री सामंत यांनी केले आहे.
अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती, शिवकालीन गाव, बाजार बारकाईने येथे उभारण्यात आला आहे. मला याचा अभिमान वाटतो, डोळ्याचे पारणे फिटले, अशा प्रकारचे उत्तम काम झाले आहे.
आपण आपला परिसर स्वच्छ ठेवायला शिकलो पाहिजे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

निधी कमी पडू दिला जाणार नाही
शौर्य कसे असले पाहिजे, शौर्य गाजवणारा राजा योध्दा कसा होता, एकही लढाई न हारलेल्या शंभूराजांच्या शौर्याचा अभिमान तमाम शिवप्रेमींना आणि पुढच्या पिढ्यानपिढ्या सगळ्यांना शंभू महाराजांचे शौर्य समजले पाहिजे.
त्यासाठी संगमेश्वर येथे स्मारक उभारले जाईल. त्याचा अभिमान वाटावा, त्याची प्रेरणा सगळ्यांना मिळेल, असे हे स्मारक असेल.
या परिसरातील हेरिटेज मंदिरांचे काम देखील केले जाईल. अशा कामांसाठी कितीही निधी लागू दे, राज्य सरकार कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्मंत्री पवार यांनी यावेळी दिली.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, कोकणातील सर्वात मोठी ही शिवसृष्टी आहे. अरबी समुद्राच्या बाजुला छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा असणारा देशातील पहिला पुतळा रत्नागिरीत आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी जे जे पैसे मागितले, ते ते पैसे हात न आखडता शासनाने दिले आहेत. विकास कामे, नाविण्यपूर्ण उपक्रम प्रमाणिकपणे राबविण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी कळ दाबून आणि प्रकाश झोत पुतळ्यांवर टाकून शिवसृष्टी २ चे लोकार्पण केल्यानंतर एकच शिवगर्जना झाली.
फटाक्यांच्या आतषबाजीत, छत्रपतींच्या जयजयकारात यावेळी उपस्थितींकडून आसमंत दुमदुमुन गेला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी शिवसृष्टीची पाहणी करुन कौतुक केले.