रत्नागिरी: लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर, मतदारांचे आभार मानण्यासाठी रत्नागिरीमध्ये भव्य आभार यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांचे आभार मानणार आहेत.
शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता, चंपक मैदानावर ही यात्रा होणार आहे.
महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला भरभरून आशीर्वाद देत मोठा विजय मिळवून दिला आहे.
या विजयाबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी आणि महायुतीचा महाविजय साजरा करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेत महायुतीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं आहे. त्यांच्या सोबतीला राज्यमंत्री योगेश कदम आणि आमदार किरण सामंत आहेतच.

या आभार यात्रेत जनतेला संबोधित करताना, नेते विजयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतील आणि पुढील वाटचालीसंदर्भात मार्गदर्शन करतील, अशी शक्यता आहे.
यात्रेत महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महायुती आणि रत्नागिरीमधील जनतेच्यामधील संवाद अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या आभार मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेची सदस्य नोंदणी देखील जोमानं करण्यात येणार आहे. यासाठी शिवसेनेने मिस कॉल देण्यासंदर्भातला नंबर देखील जारी केला आहे. या सदस्य नोंदणी मोहिमेला शिवसेनेने शिवकार्य सदस्य नोंदणी असे नाव दिले आहे.
