दापोली: तालुक्यातील भोपण येथील मुस्लिम मोहल्ला येथून बेपत्ता झालेल्या 6 वर्षीय नुसेबा हनीफ सहीबोले हिचा मृतदेह सापडला आहे. शेजारील खाडीमध्ये तिचा मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली आहे.
ही मुलगी १२ मार्च रोजी दुपारी अडीच ते तीन च्या सुमारास भोपण मुस्लिम मोहल्ला येथे नुसेबा आणि तिचा भाऊ मोहम्मद सहीबोले हे दोघेही सायकल फिरवीत असता सायकल फिरवून झाल्यानंतर मोहम्मद सायकल ठेवण्यास घराकडे गेला. त्यावेळी नुसेबा तेथेच उभी होती. मोहम्मद सायकल ठेवून पुन्हा नुसेबाला घेण्यासाठी आला असता त्याला नुसेबा कोठेही आढळली नाही, म्हणून घरातल्या पालकांसह सर्वांनी गावात सर्वत्र शोधाशोध सुरू केली. पण तिचा काही पत्ता लागला नव्हता. पोलीसही परीसरात तळ ठोकून होते.
अखेर आज दिनांक 14 मार्च रोजी तिचा मृतदेह खाडीत सापडल्यानं परीसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोगर कोसळला आहे.
नक्की या प्रकरणी काय झालं आहे? तिचा मृत्यू कशामुळे झाला आहे? याबद्दल पोलीस सखोल तपास करत आहेत. या घटनेचं नक्की कारण पोस्टमार्टेम अहवालानंतर स्पष्ट होईल, असं पोलीसांनी सांगितलं आहे.