नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक आणि पोटनिवडणूक २०२६ साठी उमेदवारांची यादी ३१ मे रोजी जाहीर केली आहे.
या अधिकृत घोषणेनुसार, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून अरुण लखाणी, भंडारा-गोंदियामधून अविनाश ब्राह्मणकर, आणि अमरावतीमधून प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सांगली-सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, सोलापूरमधून राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, तर छत्रपती संभाजीनगर-जालना येथून सुहास शिरसाट हे भाजपचे उमेदवार असतील.
तसेच नांदेडसाठी अमर राजूरकर, धाराशिव-लातूर-बीडसाठी बसवराज पाटील आणि जळगावसाठी नंदकिशोर महाजन यांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच, नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंग यांनी यासंदर्भातील पत्रक प्रसिद्ध केले आहे.

