बारावी बोर्ड निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय घेऊ – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतसांगली

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 12 वी च्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 12 वी बोर्डाचे निकाल पुढील काही दिवसात लागतील. त्याअनुषंगाने प्रोफेशनल व नॉन प्रोफेशनल शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले.

इस्लामपूर येथील तहसिलदार कार्यालयात प्रथम वर्ष पदवी प्रवेशा संदर्भात दूरदृश्यप्रणालीव्दारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वाळवा उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख, तहसिलदार रविंद्र सबनिस, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यतीन पारगावकर तसेच दूरदृश्यप्रणालीव्दारे विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, 12 वी च्या निकालानंतर विद्यार्थ्यांचा कल विविध प्रोफेशनल शिक्षणाकडे जाण्याचा असतो. यासाठी सीईटी परीक्षा महत्वपूर्ण असते. या सीईटी च्या परीक्षा आयोजित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून तयारी सुरू आहे. १२ वीचा निकाल लागल्यानंतर तत्काळ प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांना समान गुण मिळतील अशा काही अडीअडचणी सोडवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होईल याबाबत निर्णय घेण्यात येतील.

तंत्र शिक्षणाच्या प्रवेशाची प्रक्रिया साधारण जुलै – ऑगस्ट पर्यंत चालते. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही विचार यावेळी करण्यात येईल. 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागल्यानंतरच गुणांची टक्केवारी कळेल. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे धोरण राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठरेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*