दापोली – आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन, दापोलीच्या आर. आर. वैद्य इंग्लिश मिडीयम स्कूल येथे दि. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या चेअरमन जानकी उदय बेलोसे, विश्वस्त मीना कुमार रेडीज, संस्थेच्या जनसंपर्क अधिकारी सुनिता दिलीप बेलोसे उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांच्या हस्ते स्त्री शिक्षणाच्या आद्यप्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
शाळेच्या मुख्याध्यापिका भक्ती महाडीक यांनी महिलादिनाचे महत्त्व आपल्या प्रस्तावनेत सांगितले. यावेळी शाळेतील शिक्षिका माधुरी सावंत, सिध्दी बांद्रे, सौ. अरुंधती राऊळ यांची यथोचित भाषणे झाली. संस्थेच्या जनसंपर्क अधिकारी व कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सुनिता बेलोसे यांनी आपल्या भाषणात स्त्रियांचे महत्त्व पटवून देताना स्वरचित कविता सादर केली.
संस्थेच्या चेअरमन जानकी उदय बेलोसे यानी स्त्रियांनी सर्व जबाबदारी सांभाळतानाच आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे असे नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा व संस्थेच्या विश्वस्त मीना रेडीज यांनी स्त्रियांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता स्वावलंबनाने पुढे जावे व नव्या पिढीला सक्षम बनवावे असे विचार व्यक्त केले. यावेळी शालेय परिवारातील सर्व महिलांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीत शिक्षक नीळकंठ गोखले सर यांनी केले. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होता