दापोली- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात नारीशक्ति सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षक संघ दापोली महिला आघाडी प्रमुख नम्रता चिंचघरकर यांच्या अध्यक्षतेखालील या समारंभात दापोली तालुक्यातील अनेक प्राथमिक शिक्षिका व शिक्षक उपस्थित होते.
दापोली येथील पद्मश्रद्धा सभागृहात पार पडलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात दापोली येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डाॅ. विद्या दिवाण, रक्त तपासणीतज्ञ दिपाली मोहिते, दापोली शिक्षक संघ अध्यक्ष संदीप जालगांवकर, सचिव गणेश तांबिटकर, अश्विनी मोरे, जीवन सुर्वे, अविनाश मोरे, केंद्रप्रमुख दिपाली जुवेकर, मधुरा सोमण आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षिकांचे मानसिक ताणतणाव, मानसिक व शारीरिक स्वास्थ्य, आंतरिक व बाह्य व्याधी, आजार व त्यांवरील उपाय, त्वचाविकार व त्यांवरील सोपे, घरगुती उपाय या विषयावर सविस्तर विवेचन केले.
शिक्षिकांच्या वैयक्तिक समस्या व व्याधींबाबतही उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यानंतर रक्त तपासणीतज्ञ दिपाली मोहिते यांनी विशिष्ट वयानंतर नियमित रक्त तपासणी करणे किती आवश्यक आहे, अशी तपासणी केली नाही तर कोणकोणते गंभीर आजार उद्भवू शकतात याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
याशिवाय टी.डब्ल्यु.जे. संस्थेच्या महेश चांदे यांनी जागतिक महिला दिन आणि वैयक्तिक स्वास्थ्य या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी डाॅ. विद्या दिवाण यांचा सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानासाठी विशेष सन्मान करण्यात आला.
या विशेष कार्यक्रमानिमित्त उपस्थित महिलांसाठी फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. फनी गेम्स मधील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.
जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोली आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी मंदाडे, सुचिता पवार, सुवर्णा सोनवणे यांनी केले तर संदिप जालगांवकर यांनी सर्वांचे आभार मानले.