चिपळूण : विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर भारताच्या नाट्यपरंपरेत एक नवा अध्याय रचला जाणार आहे.

देशातील पहिले वन्यजीव नाटक ‘संगीत बिबट आख्यान’ २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सादर होणार आहे.

वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण जागरूकतेचा संदेश देणारे हे विनोदी नाटक प्रेक्षकांना मनोरंजनासह विचारप्रवर्तक अनुभव देईल.

हे नाटक भारतीय जंगलातील गूढ आणि देखणा प्राणी असलेल्या बिबट्याच्या जीवनावर आधारित आहे.

बिबट्याचे अधिवास, पिलांचे संगोपन आणि मानवी वस्तीच्या वाढत्या प्रभावामुळे निर्माण होणारे धोके यांचे नाट्यमय चित्रण यात आहे.

मानव आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष आणि सहजीवनाचा गुंतागुंतीचा धागा हे नाटक संवेदनशीलपणे उलगडते. वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणे हा या नाटकाचा प्रमुख उद्देश आहे.

भारतातील जैवविविधतेचे रक्षण आणि निसर्गाशी जबाबदारीने सहजीवन जगण्याचे आवाहन हे नाटक प्रेक्षकांना करते.

‘संगीत बिबट आख्यान’ हे नाटक संगीत आणि कसदार अभिनयाने सजले आहे.

पारंपारिक आणि आधुनिक संगीताचा संगम, बिबट्यावर आधारित भारुड, लावणी, कव्वाली, निसर्गाची नांदी, भैरवी आणि शाहिरी गाणी यामुळे हा प्रयोग अविस्मरणीय ठरणार आहे. बिबट्याच्या दृष्टिकोनातून जग पाहण्याची अनुभूती देणारे हे नाटक प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडेल.

या प्रयोगाला स्थानिक प्रशासन, पर्यावरण कार्यकर्ते, शिक्षणतज्ञ आणि नागरिक उपस्थित राहणार असून, ते वन्यजीव संरक्षणाच्या गरजा आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा करतील.

चिपळूण आणि रत्नागिरीतील स्थानिक नट आणि गायकांचा यात समावेश आहे. हा प्रयोग शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरेल.

या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचे साक्षीदार होण्यासाठी आणि भारताच्या पहिल्या वन्यजीव नाटकाचा अनुभव घेण्यासाठी २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रवेश विनामूल्य आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन वन विभाग रत्नागिरी यांनी केले असून, चिपळूण वन परिक्षेत्र अधिकारी सरवर खान आणि त्यांचे कर्मचारी नियोजन करत आहेत. विभागीय वनाधिकारी
गिरिजा देसाई आणि सहाय्यक वन संरक्षक प्रियांका लगड यांचे मार्गदर्शन लाभत आहे.