दापोलीच्या विधी गोरे या खेळाडूनं 59 किलो वजनी गटाच्या तायक्वॉंदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. तेलंगणा इथं झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिनं दापोलीचं नाव उंचावलं आहे.

विधी ही दापोली पोलीस ठाण्याचे हवालदार दीपक गोरे यांची कन्या आहे. तेलंगणा राज्यातील हैद्राबाद मध्ये झालेल्या या स्पर्धेसाठी तिनं प्रचंड मेहनत घेतली होती. महाराष्ट्रासाठी पदक आणणारच हा पण तिने स्पर्धेला जाण्यापूर्वी केला होता.

राज्यस्तरीय स्पर्धेचे बक्षीस स्वीकारताना विधी गोरे

महाराष्ट्र संघाकडून खेळत असताना विधीनं अंतिम सामना आसामच्या खेळाडू विरुद्ध खेळला. या मध्ये दमदार कामगिरी करत तिने 59 किलो तायक्वॉंदो कॅडेट स्पर्धेत विजय मिळवत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. विधी सध्या 15 वर्षांची आहे. आपल्या अंगी असलेल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने आपल्या जिल्ह्याचं आणि कुटुंबीयांचं नाव उज्ज्वल केलं आहे.

विधी सध्या रोटरी शाळेत आठवी कक्षामध्ये शिकत आहे. विधीनं या यशाचं श्रेय आपल्या आई वडिलांना आणि प्रशिक्षक कृणाल चव्हाण यांना दिलं आहे. या उल्लेखनीय कामगिरी बद्दल दापोलीतून तिचं सर्वस्तरातून कौतुक होत आहे.