रत्नागिरी ; येथे विश्वेश्वरय्या हॉलमध्ये कोकण परिक्षेत्रातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांसाठी २१ आणि २२ जुलै रोजी दोन दिवसीय “कॅपॅसिटी बिल्डिंग अँड बिहेव्हियरल लीडरशिप इनिशिएटिव्ह” प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या नेतृत्वाखाली हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले.
या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्व क्षमतेचा विकास करणे, प्रशासकीय कौशल्य अधिक प्रभावी बनविणे, नागरिकाभिमुख पोलीसिंगला चालना देणे आणि आधुनिक पोलीस व्यवस्थापनाच्या संकल्पनांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य प्रदान करणे हा होता.
दोन दिवस चाललेल्या या शिबिरात नेतृत्व कौशल्य, प्रशासकीय क्षमता, प्रभावी संवादकौशल्य, वर्तन कौशल्य तसेच नागरिकांशी संवेदनशील, सकारात्मक आणि विश्वासार्ह संवाद प्रस्थापित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणात पोलीस उपअधीक्षक भानुदास खटावकर, मौसमी निलाखे तसेच ईशानी कांचन यांनी विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
त्यांनी निर्णयक्षमता, प्रभावी नेतृत्व, बदलत्या काळातील पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका, संघभावना वृद्धिंगत करण्याच्या पद्धती, जबाबदारीची जाणीव, निर्णय प्रक्रियेतील परिणामकारकता आणि नागरिकांशी संवेदनशील संवादाचे महत्त्व यावर संवाद साधला.
संवादात्मक सत्रांच्या माध्यमातून सहभागी अधिकाऱ्यांना दैनंदिन कामकाजात उपयुक्त ठरणारी व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली असून, उपस्थितांनी हे प्रशिक्षण पोलीस दलातील नेतृत्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.

