दापोली : पत्नी नेहा बाक्करनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पती निलेश बाक्करचा खून करून दापोलीमध्ये खळबळ माजवून दिली आहे. पोलीसांनी वेगवान तपास करत दोन्ही संशयीत आरोपींना अटक केली आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, दिनांक 14/01/2025 रोजी गिम्हवणे उगवतवाडी ता. दापोली येथे राहणाऱ्या एका महिलेने आपला पती निलेश दत्ताराम बाक्कर (रा. गिम्हवणे) हा बेपत्ता झाल्याबाबतची खबर दापोली पोलीस ठाण्यामध्ये दिली व त्यावरून बेपत्ता दाखल करण्यात आलेला होता.
सदर बेपत्ता व्यक्तीचा तपास सुरु असताना चौकशी दरम्यान खबर देणाऱ्या बेपत्ता व्यक्तीची पत्नी ज्या हॉटेल मध्ये काम करत होती तेथून कामावरून रात्री 11.30 वाजता घरी आलेली होती असे तिने आपल्या दिलेल्या खबरीमध्ये सांगीतले होते.
प्रत्यक्षात बेपत्ता इसमाचा शोध घेत असताना बेपत्ता व्यक्तीच्या पत्नीने खबर देते वेळी पोलीसांना सांगीतलेली घरी येण्याची वेळ व ती प्रत्यक्षात कामावरुन निघून गेल्याची वेळ यामध्ये तफावत दिसून आली.
तसेच बेपत्ता व्यक्तीचा मोठा भाऊ दिनेश दत्ताराम बाक्कर याने त्याचेकडे चौकशी दरम्यान आपल्या वहिनीवर संशय व्यक्त केलेला होता.
पोलीसांमार्फत बेपत्ता व्यक्तीच्या पत्नीनेकडे अधिक तपास करण्यात आला व तपासात असे निष्पन्न झाले की, बेपत्ता व्यक्तीची पत्नी व तिचा प्रियकर मंगेश शांताराम चिचघटकट (रा. पालगड, दापोली) या दोघांनी संगनमताने तिचा पती निलेश दत्ताराम बागकर यास हर्णे-बायपास येथील मोकळ्या जागेत घेऊन जाऊन त्यास जास्त प्रमाणात दारू सेवन करण्यास भाग पाडून त्याचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून जिवे ठार मारले.

पुढे त्याच्या मृतदेहाला चार-चाकी गाडीतून नेऊन पालगड-पाटील वाडी येथील रस्त्या लगतच्या विहिरीत त्याच्या अंगावर चारचाकी गाडीचा तुटलेला लोखंडी पाटा बांधून टाकून दिलं गेलं.
असे कृत्य करून स्वतःला सदर घटनेपासून नाम-निराळे ठेवण्याकरिता तिने तिचा पती निलेश वाक्कर हा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली असल्याचे चौकशी दरम्यान सांगीतले आहे.
या गुन्ह्या मध्ये पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खेड उपविभागीय पोलीस अधिकारी भगुजी औटी, पोलीस निरीक्षक विवेक अहीरे व पथकाने निलेश दत्ताराम बागकर यांचा मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने विहीरीतून बाहेर काढून दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 15/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 238, 3 (5) अन्वये गुन्हा नोंद करून गुन्ह्याचे अनुषंगाने 1) मंगेश शांताराम चिंचघरकर टा. पालगड, दापोली, 2) मृत निलेश दत्ताराम बाक्कर याच्या पत्नीस अटक करण्यात आलेली आहे.
या कारवाईमध्ये खेड उपविभागीय पोलीस अधिकारी खेड भगुजी औटी, दापोली पोलीस निरीक्षक विवेक अहीरे, स.पो.नि. प्रविण देशमुख, पो.उ.नि राजकुमार यादव, सपोफौ अशोक गायकवाड, पोहेकॉ. अभिजित पवार, पोकॉ विकास पवार, सुहास पाटील, सुरज मोरे, रोहीत लांबोरे, मिथुन मस्कर, ज्ञानेश्वर मडके,रुपाली ढोले, निधी जाधव आदी पोलीस पथकाने कामगिरी केलेली आहे.