दापोली उपजिल्हा रुग्णालयात हृदयद्रावक घटना: लिफ्टच्या टाकीत पडून ५ वर्षीय मुलाचा मृत्यू

दापोली : दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्याने सुरू असलेल्या बांधकामात आज एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली.

रुग्णालयाच्या लिफ्टच्या टाकीत पडून ५ वर्षीय चिमुकला समीर श्रीकांत चव्हाण याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ठेकेदार आणि रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (१२ जून) दुपारी ही घटना घडली. रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना, लिफ्टच्या रिकाम्या टाकीमध्ये पाणी साचले होते.

खेळता खेळता समीर या टाकीत पडला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेने दापोली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी या अपघाताला ठेकेदाराच्या हलगर्जीपणाला थेट जबाबदार धरले आहे.

बांधकामस्थळी सुरक्षिततेच्या पुरेशा उपाययोजना न केल्यामुळेच हा अपघात घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयासमोर मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. संतप्त नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच दापोलीच्या तहसीलदार अर्चना घोलप यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनीही तात्काळ पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

या प्रकरणी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे दापोली शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*