रत्नागिरी : रत्नागिरीतील नवीन एसटी महामंडळाच्या बसस्थानकासमोर आज (मंगळवार) दुपारी एक भीषण अपघात घडला. बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या एसटी बसने एका ८२ वर्षीय वृद्धाला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव कमलाकर बाबाजी चव्हाण (वय ८२, रा. चव्हाणवाडी, जुवे, रत्नागिरी) असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, कमलाकर चव्हाण हे सकाळी रत्नागिरी बाजारपेठेत आले होते. जवळच्या मेडिकल दुकानातून औषधे घेऊन ते घराकडे परतत असताना नवीन एसटी डेपोत प्रवेश करत होते. याचवेळी बसस्थानकात येणाऱ्या एका एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर बसच्या मागील चाकाखाली येऊन त्यांचे दोन्ही पाय चिरडले गेले. यामुळे ते घटनास्थळीच गंभीर जखमी झाले.

स्थानिकांनी तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.