दापोली पतसंस्थेची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रे आणि खोटे दागिन्यांनी बनवले

दापोली : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेची बनावट कागदपत्रे आणि खोटे दागिने वापरून फसवणूक केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोशन गोविंद पेंढारी (रा. तुळशेत पाडा, भांडुप, मूळ रा. कोळे, ता. म्हसळा, जि. रायगड), वैभव भगत (पत्ता अज्ञात) आणि सरिता दिपक ठाकरे (पत्ता अज्ञात) अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:00 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी निशीगंधा प्रशांत हेदुकर (रा. दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात रात्री 9:32 वाजता फिर्याद नोंदवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दापोली येथील श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत वनिता सुरेश केळकर (रा. खेर्डी, ता. दापोली) या खोट्या नावाने बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड सादर केले. खोटे दागिने खरे असल्याचे भासवून पतसंस्थेकडून 2 लाख 90 हजार रुपयांचे सोने तारण कर्ज घेतले आणि फसवणूक केली.

याशिवाय, रोशन पेंढारी आणि सरिता ठाकरे यांनी चिपळूण शाखेत सरिता नरेश तवसाळकर या खोट्या नावाने बनावट कागदपत्रे सादर करून आणि खोटे दागिने गहाण ठेवण्याचा प्रयत्न करून तेथील शाखेचीही फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 318(4), 319(2), 335, 336(3) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*