दापोलीत बंद घर फोडून १३ लाखांची घरफोडी

दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गव्हे पवारवाडी येथे एक मोठी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे.

फिर्यादी अशोक गोविंद पवार हे आपल्या कुटुंबासह गावातील भैरी देवीच्या यात्रेसाठी गेले असताना, १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ च्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले.

चोरट्याने घराच्या मागील बाजूच्या सिमेंटच्या दरवाजाला कोयता, पक्कड आणि चाकूच्या साहाय्याने छिद्र पाडून आत प्रवेश केला.

त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर चावीने उघडले आणि त्यातील सुमारे ११ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १३ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणाला विशेष वळण मिळाले आहे कारण चोरीच्या तपासादरम्यान फिर्यादीचे शेजारी राहणाऱ्याच्या खिशात चोरीला गेलेल्या दागिन्यांची ‘माताजी कलेक्शन व साडी सेंटर’ची पिवळसर पिशवी मिळून आली. या पुराव्यावरून अशोक पवार यांनी संबंधित व्यक्ती आणि त्याच्या मुलानेच ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

चोरीला गेलेल्या मालामध्ये २० ग्रॅमचे दोन आणि २५ ग्रॅमचे दोन असे एकूण चार मौल्यवान गंठण, १५ ग्रॅमचा एक हार, १२ ग्रॅमचा चपली हार आणि १० ग्रॅम वजनाचे दोन हार यांचा समावेश आहे.

याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३३१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*