पुणे ही शिक्षणाची पंढरी असून ही ओळख आणखी ठळकपणे जगासमोर आणण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच पुणे येथे प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनी आणि बारामती येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 119व्या पदवी प्रदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचे मुंबई येथील महावाणिज्यदूत पिटर ट्रसवेल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.गरीब कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी ‘कमवा व शिका’ योजना अधिक व्यापक आणि नव्या स्वरूपात राबविण्याचा विचार करण्यात येत आहे. अधिकाधिक मुलांना या योजनेचा लाभ होण्यासाठी प्रत्येक विद्यापीठातून या योजनेचा प्रसार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जागतिक स्पर्धेला यशस्वीपणे सामोरे जाणारे विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यापीठातून नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.