नांदेड : जिल्ह्यात व शहरात एक ते दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासनासह महापालिका सातत्याने यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाही नांदेडकर ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे जिल्ह्यात नाईलाजास्तव २५ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी व्यक्त केले.
नांदेड शहर व जिल्हा लॉकडाऊन निर्णयाबाबत रविवारी (ता.२१) अधिकाऱ्यांची बैठक झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त अजितपालसिंघ संधू, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासह जिल्हा प्रशासन व मनपाच्या प्रमुख अधिकारी बैठकिला उपस्थित होते. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचाही आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.
राज्य शासनाने लॉकडाउनसंदर्भातील अधिकार जिल्हाधिकारी यांना दिलेले आहेत. जिल्ह्याची तसेच शहराची सध्याची परिस्थिती बघता २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून चार एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाउन करण्यात येत आहे. नांदेड शहर व जिल्ह्याची परिस्थिती पाहता लॉकडाउन हा एकच पर्याय असल्याचे मत बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी व्यक्त केले होते. अचानक लॉकडाउन लावणे योग्य नसल्यामुळे नागरिकांना खरेदीसाठी दोन दिवसाचा अवधी दिल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.
संपूर्णतः बंद
• हॉटेल्स, उपहारगृह, बार तसेच सार्वजनिक कार्यक्रम.
• मटन, चिकन, अंडी व मासे विक्री
• सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी
• सर्व प्रकारचे बांधकाम व कंन्स्ट्रक्शनची कामे
चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, रिसॉर्ट, मॉल, आठवडी बाजार
• सामाजिक, राजकीय, सांस्कृतीक व धार्मिक कार्यक्रम
• सलुन व ब्युटी पार्लरची दुकाने
• मोकळ्या जागेत, उद्यानांमध्ये फिरणे.
• सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग तसेच इव्हिनिंग वॉक
शाळा, महाविद्यालये तसेच शिकवणी वर्ग पूर्णतः बंद
यांना आहे सवलत
• किराणा दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहतील दुध विक्री व वितरण सकाळी १० वाजेपर्यंत करता येईल
भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी सात ते १० या वेळेतच करता येईल.
• खासगी व सार्वजनिक वैद्यकिय सेवा सुरु राहतील पेट्रोल पंप व गॅस वितरण सेवा सुरु राहणार असून कर्मचाऱ्यांना गणवेश, ओळखपत्र बंधनकारक असेल.
• वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी सहा ते नऊ या वेळेतच वर्तमानपत्रांचे वितरण करता येईल.
• पाणी पुरवठा (जार, टँकर) दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.
• स्वस्त धान्य दुकाने सुरु राहतील
• अंत्यविधीसाठी २० व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी असेल
• औषध विक्रीचे दुकाने २४ तास सुरु राहतील