मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांनी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, मंगळवार, 13 मे 2025 रोजी दुपारी 1:00 वाजता जाहीर होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
महाराष्ट्र बोर्डाने निकाल जाहीर करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असून, विद्यार्थ्यांना त्यांचे गुण ऑनलाइन तपासण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळ mahresult.nic.in किंवा sscresult.mkcl.org वर त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करावे लागेल.
यंदा कोकण विभागीय शिक्षण बोर्डाकडून गेल्या 13 वर्षांपासून सलग 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवण्याच्या दृष्टीने विशेष लक्ष वेधले गेले आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका शाळांमधून मिळणार असून, ऑनलाइन निकालाची प्रिंटआउट तात्पुरत्या स्वरूपात वापरता येईल.
बोर्डाने विद्यार्थ्यांना आणि पालकांना फक्त अधिकृत संकेतस्थळांवरूनच निकाल तपासण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा फसवणुकीला बळी पडू नये.
निकालाच्या दिवशी वेबसाइटवर येणारा ताण लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांनी संयम राखून निकाल तपासण्याचा प्रयत्न करावा, असेही बोर्डाने सुचवले आहे.