दापोली : भोपण येथील 6 वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणी पोलीसांनी वेगवान तपासाला सुरूवात केली आहे. पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी योग्य दिशेनं तपास करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

दापोली येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसह दिनांक 08/03/2021 रोजी तिच्या मामाच्या लग्नकार्यासाठी भोपण ता. दापोली येथे आजोळी आलेली होती.

मृत झालेली चिमुकली

सदर मुलगी दिनांक 12/03/2021 रोजी दुपारच्या सुमारास तिच्या अल्पवयीन मामेभावासोबत भोपण एस.टी.स्टॅन्ड ते तिचे आजोळ घराच्या परिसरात सायकलवरून खेळत असताना तिच्यासोबत खेळत असणारा मामेभाऊ हा सायकल ठेवण्यासाठी घराकडे जाऊन सायकल ठेऊन परत आला असता त्याला सदर अल्पवयीन मुलगी ती खेळत असलेल्या परिसरात दिसून आली नाही.

तिच्या कुटुंबियांनी तिचा सर्व ठिकाणी शोध घेऊनही ती मिळून न आल्यामुळे सदर अल्पवयीन मुलीस कोणीतरी पळवून नेली असल्याबाबत खात्री झाल्याने तिच्या मामाने दिनांक 13/03/2021 रोजी दिलेल्या तक्रारीवरून दाभोळ सागरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 05/2021 भा.दं.वि.कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने शशिकिरण काशिद , उप विभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग व राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक, दापोली पोलीस स्टेशन यांनी दिनांक 13/03/2021 रोजी त्वरित भोपण येथे घटनास्थळी भेट दिली होती.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक सावर्डेकर, दाभोळ पोलीस स्टेशन हे करत असून सदर अल्पवयीन मुलीचा शोध स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने भोपण गाव व आसपासच्या परिसरात कसोशीने करण्यात येत होता.

परंतू काल रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही सदर मुलीचा शोध लागला नव्हता. आज दिनांक 14/03/2021 रोजी पोलीस व ग्रामस्थ तिचा पुन्हा शोध घेत असताना सदर मुलीचा मृतदेह भोपण गावालगतच्या जेटीजवळच्या खाडीमध्ये मिळून आला आहे.

घटनास्थळ पंचनामा करून तिचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी उप जिल्हा रुग्णालय, दापोली येथे नेण्यात आला असून वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच त्यानुसार पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

आज डाॅ. मोहित कुमार गर्ग, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी सदर गुन्ह्याचे अनुषंगाने सदर ठिकाणी भेट दिली असून सदर गुन्ह्याचे तपासकामी संबंधित पोलीस अधिकारी यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.