पै. सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरीचा पुण्यात किताब जिंकला. मानाची गदा खांद्यावर घेत मध्यरात्री आपली कर्मभूमी, कुस्ती पंढरी, कोल्हापूर नगरी गाठली. सिकंदरचे वस्ताद विश्वास हारुगले त्याची चातका प्रमाणे वाट पाहत गंगावेश तालमीत बसले होते.
सिकंदर गंगावेश तालमीत दाखल झाला. सिकंदरला पाहताच गुरुवर्य विश्वास दादांचं काळीज सुपा एव्हढं झालं. सिकंदरने वस्तादांना पाहताच गदेसह त्यांचे आशीर्वाद घेतले.
विश्वास दादांनी थेट त्याला छातीशी धरलं. पाठीवर शब्बासकीच्या दोन थाप टाकल्या. आपल्या शिष्याने आपले कित्येक वर्षांचे स्वप्न पुर्ण केलं, या भावनेने विश्वास दादांच्या डोळ्यातून आनंदअश्रू ओंघळू लागले.
सिकंदरने आखाड्यात प्रवेश केला. ज्या मातीत घाम गाळला, ज्या मातीने मोठं केलं, ती माती कपाळाला लावली अन् खांद्यावरील गदा त्या तांबड्या मातीला अर्पण केली.
गंगावेश तालमी बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सिकंदरने तालमीतल्या सर्व आपल्या लंगोटी यारांची भेट घेतली.
तोपर्यंत पहाट झाली. तांबडं फुटलं. सिकंदरने अंघोळ उरकली. गदा घेवून थेट गुरुवर्य विश्वास दादांचे गाव गाठले. कोल्हापूर नजिकचे कोगे हे गाव.
वस्तादांच्या घरी त्यांच आगमन झालं. थेट वस्तादांच्या आईचे सिकंदरने आशीर्वाद घेतले. सिकंदरच्या रुपाने जणू आपलाच पोरगा महाराष्ट्र केसरीची गदा घेवून आपल्या समोर उभा राहिलाय असं वस्तादांच्या आईला वाटत असावं.
आईने सिकंदरच्या गालावरुन, बाहूवरुन मायेने हात फिरवले व आपल्या डोक्याला बोटे लावत ती बोटे मोडली. औक्षणाचे ताट आले, गावातल्या माय माऊल्यांनी ओवाळणी केली.
गुलालाची उधळण झाली. सगळीकडे आनंदी आनंद. सिकंदरची पहिली विजयी मिरवणूक वस्ताद विश्वास दादांच्या गावात निघाली.
कुस्ती सम्राट पै.आस्लम काझीला ही असचं विश्वास दादांनी तयार केलं होतं. आस्लम काझींच्या ही अशाच मिरवणूका कोल्हापूरात निघत होत्या.
कोण, कुठला सिकंदर शेख. गाव त्याचं सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ. आपली जन्मभुमी, आपले आई – वडील सोडून त्याने आपली कर्मभूमी गाठली.
वस्तादांना, तालमीतल्या मातीला, आपलेल्या घडवणाऱ्या वस्तादांच्या आईला प्रथम नमन करुन खरी कृतज्ञता व्यक्त केली.
जणू आपल्याच घरातलं पोरगं महाराष्ट्र केसरी झालंय या आनंदाने सगळ्या गावानं त्याचं स्वागत केलं.
आपला शाहू राजा आज हवा होता. या आनंदोत्वाचा त्याला हेवा वाटला असता. सिकंदरला शब्बासकी देत त्याला गळ्याला लावलं असतं. शाहू महाराजांनी कोल्हापुरातून सिकंदरची मिरवणूक काढली असती.
– पै.मतीन शेख