दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये धक्कादायक ट्विस्ट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये आघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे वरिष्ठ नेत्यांनी यासंदर्भातील आदेश दिल्याचं बोलत जात आहे मुंबईमध्ये सध्या बैठकांवर बैठका होत असल्याची माहिती माय कोकणच्या सूत्रांनी दिली आहे
ही माहिती समोर येताच अनेक इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवार ही बातमी ऐकून सध्या बेचैन झाले आहेत.
दापोली आणि मंडणगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून आतापर्यंत ओळखले जात होते. आता ही नवीन माहिती समोर आल्यामुळे कार्यकर्त्यांची गोची झाली आहे.
जागावाटप कशाप्रकारे होणार, कोणता वार्ड कोणाला दिला जाणार? याबद्दलची चर्चा मुंबईत होत असल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते याबद्दलची चर्चा करत असल्याचंही कळत आहे. या नव्या समीकरणामुळे ज्यांची उमेदवारी आतापर्यंत निश्चित मानली जात होती. त्यांच्या उमेदवारीवरच आता टांगती तलवार आली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आमदार योगेश कदम आणि माजी आमदार संजय कदम यांच्यामधील वैर सगळ्यांनाच माहित आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून दोघे एकत्र येणार का? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.
आज रात्रीपर्यंत या नव्या आघाडीबद्दल खात्रीशीर माहिती समोर येण्याची चर्चा आहे. जर हे दोघे एकत्र आले तर काँग्रेस पक्षाचं काय? असा प्रश्न देखील निर्माण होतो आहे.
शिवाय राष्ट्रवादीला जास्त जागा मिळणार की शिवसेनेला हाही एक मुद्दा समोर येण्याची शक्यता आहे. दापोली नगरपंचायतमध्ये सतरा वार्ड असल्याने समसमान जागा वाटप होणं अशक्य आहे.
कुठल्यातरी एका पक्षाला आठ जागा द्यावे लागतील आणि एकाला नऊ.
जर काँग्रेस सुद्धा या आघाडीमध्ये सामील झाली तर समीकरण बदलू शकतं असंही बोललं जात आहे. पण सध्या तरी काँग्रेस या आघाडीमध्ये सामील होणार की नाही याबाबत मोठा संभ्रम आहे.