दापोली : दापोली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विरसई शाळेत कार्यरत असलेले ध्येयवेडे पदवीधर शिक्षक श्री. संदीप काशिराम भेकत यांना कोल्हापूर येथील महाराष्ट्र राज्य पुरस्कारप्राप्त जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेमार्फत राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दापोली येथे आयोजित समारंभात जनकल्याण सामाजिक संस्थेचे सदस्य सुरेश पाटील, अखिल शिक्षक संघटनेचे विजय फंड, भालचंद्र घुले, किशोर धुमाळ, केंद्रप्रमुख शशिकांत बैकर, वाळंज यांच्या हस्ते भेकत यांना सपत्निक सन्मानित करण्यात आले.

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्वप्नवत उपक्रमांतर्गत नासा-इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी पहिल्याच वर्षी शिरसोली गावच्या धनश्री जाधव हिची निवड झाली, तर विरसई मराठी शाळेत संदीप भेकत यांनी सलग तीन वर्षे उत्कृष्ट कार्य केले.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नासा-इस्रो अभ्यास दौरे, शिष्यवृत्ती, नवोदय विद्यालयाच्या निवड प्रक्रियेत यश मिळवले. याशिवाय, रंगोत्सव सेलिब्रेशन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धांमध्ये दरवर्षी विरसई शाळेचे अनेक विद्यार्थी सुवर्णपदक पटकावत आहेत. या यशाचे संपूर्ण श्रेय भेकत सरांना देण्यात येते.

भेकत सर ज्या शाळेत कार्यरत होतात, तिथे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ होते. ते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देतात आणि नासा-इस्रो, आर.टी.एस., गणिताचा भास्कराचार्य यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळवून देतात.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेने त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला. या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

पुरस्कार स्वीकारताना भेकत यांनी सांगितले की, हा सन्मान पालक, विद्यार्थी, मित्रपरिवार आणि कुटुंबाच्या सहकार्यामुळे मिळाला आहे.

Advertisement