दापोली : तालुक्यातील साखळोली नं. १ येथील ग्रामपंचायतीमार्फत महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गावातील जिल्हा परिषद शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

रत्नागिरी जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेत दापोली तालुक्यात तिसरा क्रमांक मिळवणारा ऋग्वेद लोवरे, नववा क्रमांक पटकावणारी प्रांजल नवरत, तसेच मंथन आणि बी.डी.एस. परीक्षेत रौप्य पदक मिळवणारी आद्या गोरीवले आणि मंथन परीक्षेत यशस्वी ठरलेली सिया देवघरकर या चार विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

ग्रामपंचायत साखळोलीच्या सरपंच दिक्षा तांबे, उपसरपंच दिनेश जाधव आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैभवी गोरीवले यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन गौरवण्यात आले. यासोबतच शाळेतील सर्व शिक्षकांचाही गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेत वैभवी गोरीवले आणि ग्रामपंचायतीत दिक्षा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
सोहळ्यादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी चावडी वाचन सादर केले, तर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तू देऊन शाळेचा भावपूर्ण निरोप घेतला. शाळेचे मुख्याध्यापक संजय मेहता यांनी उपस्थितांचे स्वागत करून सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला सरपंच दिक्षा तांबे, उपसरपंच दिनेश जाधव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैभवी गोरीवले, समीर ठसाळ, सुरेश पाटील, शिक्षक, अंगणवाडी सेविका तनुश्री शिंदे, कोमल नवरत, महेश तांबे, आशिष तांबे, ग्रामपंचायत सदस्य, असंख्य ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते.
हा सोहळा विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव तर झालाच, शिवाय गावाच्या एकजुटीचे आणि शिक्षणाप्रती असलेल्या बांधिलकीचेही प्रतीक ठरला.