दापोली : काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाबुराव बेलोसे साहेब यांचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप बेलोसे यांचं शनिवारी पुणे येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झालं.
राजकारणाबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिलीप बेलोसे यांचं भरीव योगदान होतं. आर. व्हि. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन, दापोलीचे ते संचालक म्हणून गेली अनेक वर्ष काम पाहत होते. दापोली सुप्रसिद्ध आर. आर. वैद्य इंग्लिश मिडियम स्कूल आणि वराडकर कॉलेज या संस्थेमार्फत चालवले जाते. या संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांचं योगदान महत्त्वाचं राहिलं आहे.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं दुःख
“त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. ते पक्षाशी एक निष्ठ व पक्षाच्या प्रत्येक कामामध्ये अग्रेसर असायचे. त्यांच्या अचानकपणे जाण्याने पक्षाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.” शहर अध्यक्ष सिराज रखांगे बोलत होते.
“जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांच्यानंतर काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. त्यांचं पक्षामध्ये असणं आम्हाला बळ देत होतं. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.” काँग्रेस तालुकाध्यक्ष भाऊ मोहिते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.