दापोलीतील करजगाव येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण

दापोली : तालुक्यातील करजगाव चिपळुणकरवाडी येथे माजी सैनिकाच्या कुटुंबाला घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी, २२ जून २०२५ रोजी सकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सेवानिवृत्त ऑर्डिनरी कॅप्टन सुदेश केशव चिपळुणकर (वय ५७) यांच्या तक्रारीनुसार, प्रसाद चंद्रकांत धयाळकर आणि 5 महिला आरोपींविरोधात दापोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रसाद धयाळकर याच्या विहिरीच्या बांधकामात सुरुंग लावण्यास फिर्यादी सुदेश चिपळुणकर यांनी सुमारे एक वर्षापूर्वी विरोध केला होता. याच रागातून प्रसाद धयाळकर आणि त्याच्यासोबतच्या तीन महिलांनी शनिवारी सकाळी सुदेश चिपळुणकर यांच्या करजगावातील राहत्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यांनी सुदेश चिपळुणकर, त्यांच्या आई आणि पत्नी यांना हाताने मारहाण करीत शिवीगाळ केली. इतकेच नव्हे, तर त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

या घटनेनंतर सुदेश चिपळुणकर यांनी तात्काळ दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपी प्रसाद चंद्रकांत धयाळकर हा मूळचा करजगाव चिपळुणकरवाडी येथील रहिवासी असून, सध्या मुंबईत वास्तव्यास आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*