हिंदू संस्कृती, वेदांची परंपरा शिकविणारे क्षेत्रीय वैदिक संमेलन

भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राची ताकद देशाला कळेल -पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी – कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ.पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरीत उपकेंद्र सुरु केल्याचे मला समाधान आहे.

या केंद्रातून प्रशिक्षित झालेले विद्यार्थी लाखोंना प्रशिक्षण देतील. त्यावेळी या केंद्राची ताकद देशाला कळेल. हिंदू संस्कृती, वेदांची परंपरा शिकविणारे हे क्षेत्रीय वैदिक संमेलन आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी काढले.

कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची भारतरत्न डॉ.पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र आणि महर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन यांच्या संयुक्त विद्यमाने कालपासून क्षेत्रीय वैदिक संमेलन सुरु झाले आहे.

आजच्या दुसऱ्या दिवशी पालकमंत्री डॉ. सामंत यांनी भेट दिली. यावेळी कुलगुरु प्रा. हरेराम त्रिपाठी, उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असताना हे उपकेंद्र रत्नागिरीत सुरु करण्यात आले. अनेकांनी आरोप प्रत्यारोप केले.

परांतु, आज मला समाधान आहे. या उपकेंद्रात वेद पठन करणारे, संस्कृतचे शिक्षण घेणारे लाखोंना प्रशिक्षण देतील.

हिंदू संस्कती आणि वेदांची परंपरा या संमेलनामधून सर्वदूर पसरली जाईल. या केंद्राची ताकद भविष्यात देशाला कळेल. हिंदू संस्कृती आणि वेदांची परंपरा शिकविणारे क्षेत्रीय वैदिक संमेलन पुढील वर्षापासून मोठ्या प्रमाणावर खुल्या मैदानात आयोजित करावे.

त्याची जबाबदारी माझ्यावर द्यावी. आपली संस्कृती, आपली परंपरा दाखवून देण्यासाठी, पुढे घेवून जाण्यासाठी आणि जपण्यासाठी अशी संमेलने प्रत्येक जिल्ह्यात झाली पाहिजेत.

शासनाच्या माध्यमातून योगा शिकविणारे राज्यातील एकमेव हे केंद्र असल्याचे सांगून पालकमंत्री डाॕ सामंत म्हणाले, देशाची, राज्याची आणि हिंदू धर्माची संस्कृती जपणारे आहोत हे देखील रत्नागिरी जिल्हा दाखवून देत आहे आणि तुमची शिकवण पुढे घेवून जाणारा जिल्हा असेल असेही पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री डॉ. सामंत यांनी चारही वेदांना फुले वाहून त्यांचे पूजन केले तसेच भारतमाता प्रतिमा पूजनही केले.

कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरु यांच्या प्रा. त्रिपाठी यांच्या हस्ते पालकमंत्री डॉ. सामंत यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*