“रत्नागिरी अमली पदार्थमुक्त करणार, नशेच्या विरोधात कठोर कारवाई”: पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यातील “सामाजिक सलोखा समिती” ची बैठक आणि जनतेचा दरबार दिनांक १३ जून २०२५ रोजी “बाळासाहेब माटे सभागृह”, चिपळूण येथे संपन्न झाला.

बैठकीदरम्यान नितीन दत्तात्रय बगाटे यांनी रत्नागिरी जिल्हा “अमली पदार्थ मुक्त” करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, “रत्नागिरी अमली पदार्थमुक्त करणार असून, नशेच्या विरोधात कठोर कारवाई करू.” याशिवाय, अमली पदार्थांचे जिल्ह्यातून समूळ उच्चाटन करण्यासाठी कडक पावले उचलण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच, जिल्ह्यातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी आणि महिला सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रस्तावनेत उपविभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण उपविभाग राजेंद्र राजमाने यांनी चिपळूण उपविभागातील भौगोलिक परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत माहिती दिली. माजी आमदार सदानंद चव्हाण, प्रशांत यादव, शौकत मुकादम यांसह अन्य मान्यवरांनी सामाजिक सलोखा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत आपले मनोगत व्यक्त केले.

बगाटे यांनी उपस्थित जनसमुदायाच्या समस्या आणि सूचना जाणून घेतल्या. नागरिकांनी पोलीस विभागाशी संबंधित प्रश्न उपस्थित केले, ज्यावर त्यांनी तात्काळ निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीस चिपळूण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन सांवत, सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक आबासो पाटील आणि अलोटे शिरगांव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक भटट पाटील उपस्थित होते.

समारोपात फुलचंद मेंगडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता केली. बैठकीस चिपळूण तालुक्यातील सुमारे ४५० ते ५०० महिला आणि पुरुष उपस्थित होते. यामध्ये राजकीय आणि सामाजिक नेते, पत्रकार, व्यापारी संघटना, महिला संघटना, विविध गावांचे पोलीस पाटील, वकील आणि प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश होता. या जनसंवादातून नागरिकांना आपले प्रश्न थेट मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*