रत्नागिरी: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणामध्ये 27 प्रशिक्षणार्थी शिक्षकांना विषबाधा झाल्याने खळबळ माजली आहे.
रत्नागिरीतील मिरजोळे येथील MIDC मधील रॉयल बँक्वेट हॉलमध्ये तीन दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं.
यामध्ये देण्यात आलेल्या जेवणामधून त्यांना विषबाधा झाली. काहींची प्रकृती एकदम खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही शिक्षण अद्यापही उपचार घेत आहेत.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघा आक्रमक
या त्रासाच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुशील शिवलकर यांच्याशी संपर्क साधून प्रशिक्षणादरम्यान घडलेला हा प्रकार म्हणजे शिक्षकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे.
बोर्ड परीक्षेच्या तोंडावर अशी निवासी प्रशिक्षणे घेणे चुकिचे असल्याचे स्पष्ट केले. निवासी प्रशिक्षणे बंद करण्यात यावीत.
या प्रशिक्षणाच्या व्यवस्थेसाठी मिळणारा सर्व निधी संबंधित प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा. त्याचबरोबर घडल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी व सध्या अत्यावस्थ असणाऱ्या सर्व शिक्षकांशी डाएटने संपर्क करून त्यांना आवश्यक ती मदत तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने अध्यक्ष सागर पाटील यांनी प्राचार्य डॉ. सुशील शिवलकर यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरीमध्ये घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. या घटनेची तात्काळ चौकशी करून ज्यांनी कोणी याप्रकरणी हलगर्जीपणा केला आहे. त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांच्या वतीने करण्यात येत आहे.
प्रशिक्षणादरम्यान एखाद्या शिक्षकाचे भर वाईट झाले असते तर त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल देखील करण्यात येत आहे.