रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकांनी एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल नष्ट करण्याचे निर्देश राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना दिले होते. या निर्देशांचे पालन करत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सन २०१९ ते २०२६ या कालावधीत जप्त केलेल्या तब्बल ८९ लाख ७२ हजार ५ रुपयांच्या विविध अमली पदार्थांची तळोजा, नवी मुंबई येथे यशस्वीरीत्या विल्हेवाट लावली आहे.
या प्रक्रियेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ड्रग्ज डिस्पोजल समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे कामकाज पाहत असून, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि मुख्यालयाच्या पोलीस उपअधीक्षक राधिका फडके हे या समितीचे सदस्य आहेत.

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात केली आणि न्यायालयाकडून एकूण ११ गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश प्राप्त करून घेतले.
हा मुद्देमाल जाळून (Incineration) नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अर्ज करण्यात आला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळाने तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड (M.W.M.L) या सामायिक घातक कचरा प्रक्रिया आणि विल्हेवाट प्रकल्पामध्ये हा मुद्देमाल नष्ट करण्यास मंजुरी दिली.
त्यानुसार ४ जुलै २०२६ रोजी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली.

या कारवाईत १० किलो ४९ ग्रॅम ५ मिलिग्रॅम गांजा, ४३ गांजाची रोपे, ९ किलो ७८ ग्रॅम चरस आणि ९२६ ग्रॅम कोकेन (युरिया) असा एकूण २० किलो ५३ ग्रॅम ५ मिलिग्रॅम वजनाचा अमली पदार्थ नष्ट करण्यात आला.
सुरक्षेची सर्व काळजी घेत हा लाखोंचा मुद्देमाल तळोजा येथील प्रकल्पामध्ये जाळण्याच्या पद्धतीने पूर्णपणे नष्ट करण्यात पोलिसांना यश आले आहे.


