रत्नागिरी: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेमुळे जिल्ह्यात 1 हजार 37 कोटींची गुंतवणूक

रत्नागिरी: जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांनी 1 हजार 37 कोटींची गुंतवणूक करण्याचा संकल्प केला आहे.

रत्नागिरी हा उद्योगांचे केंद्र म्हणून उदयाला येत असून, पर्यावरणपूरक उद्योग आणि पर्यटन प्रकल्पांसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.

येथील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित या परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते झाले.

यावेळी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य अजगेकर, राहुल पंडित, महेश म्हाप, सुदेश मयेकर, कांचनताई नागवेकर आदी उपस्थित होते.

उद्योगमंत्री डॉ. सामंत म्हणाले, स्थानिक उद्योजकांच्या माध्यमातून 1 हजार 37 कोटींचे सामंजस्य करार झाले आहेत.

यामध्ये लोटे परशुराम येथे सुप्रिया केमिकल्स 550 कोटींची गुंतवणूक करणार आहे, तर एमएसएमईच्या माध्यमातून 500 कोटींचा समावेश आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात 115 टक्के उद्दिष्ट पूर्ण करून रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

सबसिडी वितरणाचे प्रमाण 98 टक्के आहे. मागील वर्षी 1 हजार कोटींचे विस्तारीकरण झाले, त्यापैकी 700 कोटींची अंमलबजावणी पूर्ण झाली असून, उर्वरित 300 कोटींची अंमलबजावणी येत्या वर्षभरात होईल.

परकीय गुंतवणुकीसाठी दावोसला तीन वेळा भेट दिली आणि ‘रेड कार्पेट’ संकल्पना पुढे आणली, ज्यामुळे राज्यात 96 हजार कोटींची गुंतवणूक झाली.

सीएमईजीपी योजनेत विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने 117 टक्के कर्ज मंजुरीसह उत्कृष्ट कामगिरी केली, तर कोटक महिंद्रा बँकेनेही चांगली कामगिरी नोंदवली.

रत्नागिरीत सेमीकंडक्टर आणि डिफेन्स क्लस्टरसारखे मोठे प्रकल्प आले असून, निवेंडी आणि वाटद येथे एमआयडीसी उभारली जाणार आहे.

यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. युवकांनी यासाठी आवश्यक प्रशिक्षण घ्यावे आणि स्थानिकांना रोजगार तसेच शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, ही शासनाची भूमिका आहे.

उद्योग गुजरातला गेले नाहीत, ते रत्नागिरीतच आले आहेत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

महिला बचत गटांना पर्यटन क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रोत्साहन देताना त्यांना चार टुरिस्ट वाहने देण्यात आली असून, आणखी 10 वाहने लवकरच दिली जाणार आहेत.

हाऊस बोट प्रकल्पातही महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. ‘माझी लाडकी बहीण’ ही योजना कधीही बंद होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने झाली. अजिंक्य अजगेकर यांनी प्रास्ताविक केले.

सीएमईजीपी आणि पीएमईजीपीच्या लाभार्थ्यांना कर्ज वितरण पत्रे देण्यात आली, तसेच 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकांचा स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

महिला बचत गट उमेद अंतर्गत चिपळूण येथील फूड ॲण्ड फ्रूट प्रोसेसिंग क्लस्टर, दापोली येथील फिश प्रोसेसिंग क्लस्टर आणि चिपळूण येथील गारमेंट क्लस्टर या तीन औद्योगिक समूहांसाठी 15 लाखांचा निधी वितरित करण्यात आला.

या समूहांसोबत 10 कोटींचे एमओयूही झाले. या परिषदेला बँकर्स, गुंतवणूकदार आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*