सुखप्रीत धाडिवाल आत्महत्या प्रकरणात जस्मिक केहर सिंगला अटकपूर्व जामीन मंजूर केला

रत्नागिरी: येथील भगवती मंदिरानजीकच्या पाण-भुयार स्पॉटजवळ समुद्रात बेपत्ता झालेल्या सुखप्रीत धाडिवाल (मूळ रा. एलनाबाद, जि. सिरसा, हरयाणा) हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या तिच्या मित्राला, जस्मिक केहर सिंग याला रत्नागिरी न्यायालयाने अखेर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे..

जस्मिकच्या वतीने ज्येष्ठ वकील ॲड. सचिन पारकर आणि ॲड. सागर तडवी यांनी प्रभावी युक्तिवाद करत त्याला दिलासा मिळवून दिला.

२९ वर्षीय जस्मिक केहर सिंग (सध्या रा. सिद्धिविनायक नगर, शिवाजीनगर, रत्नागिरी; मूळ रा. भाटिया कॉलनी, फतेहाबाद, हरयाणा) याच्याविरोधात सुखप्रीतचे वडील प्रकाशसिंग धाडिवाल (वय ६९, रा. एलनाबाद, जि. सिरसा, हरयाणा) यांनी ३ जुलै रोजी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनुसार, सुखप्रीत २९ जून रोजी जस्मिकला भेटण्यासाठी रत्नागिरीत आली होती. मात्र, जस्मिकने तिला भेटण्यास नकार दिल्याने तिने समुद्रात उडी मारून टोकाचे पाऊल उचलले असावे, असा आरोप प्रकाशसिंग यांनी केला आहे.

सुखप्रीत बेपत्ता झाल्याची माहिती सर्वप्रथम तिच्या वडिलांनी पिंपळगाव (नाशिक) पोलिस स्थानकात दिली होती. त्यानंतरच्या तपासात सुखप्रीत रत्नागिरीला गेल्याचे उघड झाले.

रत्नागिरीत पोहोचल्यानंतर प्रकाशसिंग यांनी घटनास्थळी सापडलेली चप्पल आणि ओढणी आपल्या मुलीची असल्याची खात्री केली.

या तक्रारीच्या आधारे रत्नागिरी पोलिसांनी जस्मिकविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (कलम ३०६) दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर जस्मिकने तातडीने अटकपूर्व जामिनासाठी रत्नागिरी न्यायालयात अर्ज दाखल केला. आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने जामीन मिळवणे आव्हानात्मक होते.

परंतु, ॲड. सचिन पारकर आणि ॲड. सागर तडवी यांनी घटनेची पार्श्वभूमी, उपलब्ध पुरावे आणि कायदेशीर तरतुदींचा आधार घेत जस्मिकची बाजू ठोसपणे मांडली.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने जस्मिक केहर सिंगला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

या निर्णयामुळे जस्मिकला तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी या प्रकरणाचा तपास सुरू राहणार आहे. या प्रकरणाच्या पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*