कोविडचा मुकाबला सक्षमपणे करण्यासाठी ऑक्सीजन पुरवठयास प्राधान्य द्या – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

200 खाटांचे समर्पित रुग्णालय रत्नागिरीसह ओणीतील 30 खाटांच्या रुग्णालयाचे लोकार्पण

रत्नागिरी : कोविडचा मुकाबला सक्षमपणे करण्यासाठी नवी कोविड केंद्र उभारुन बेडस् व रुग्णसुविधेसाठी ॲम्ब्युलन्स आदि सुविधांसोबत सर्वाधिक लक्ष ऑक्सीजनच्या उपलब्धतेवर द्यावे आणि शक्य त्या ठिकाणी ऑक्सीजन निर्माणीस प्रारंभ करावा असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिले.

रत्नागिरी शहरातील महिला रुग्णालयातील समर्पित कोविड रुग्णालयाच्या 200 खाटांचा दुसरा टप्पा आणि राजापूर तालुक्यातील ओणी येथील 30 खाटांच्या समर्पित कोविड रुग्णालयाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास रत्नागिरीचे पालकमंत्री ॲङ अनिल परब, राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत,जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव तसेच आमदार राजन साळवी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

अगदी 8 दिवसांपूर्वी नैसर्गिक आपत्तीचे यशस्वी व्यवस्थापन करुन आता जिल्हयात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. याबाबत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले. जिल्हा परिषदेतर्फे खास महिला व लहान बालकांसाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार ही निश्चित चांगली बाब आहे. सोबतच आपण ऑक्सीजनची उपलब्धता जरुर ठेवा असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्याची ऑक्सीजन उत्पादन क्षमता 1200 मेट्रीक टन आणि मागणी 1700 मेट्रीक टन अशी स्थिती दुसऱ्या लाटेत निर्माण झाली. त्यामुळे इतर ठिकाणांवरुन ऑक्सीजन आणावा लागला अशी स्थिती यापुढे येणार नाही याची खबरदारी घ्या. कोविडचा मुकाबला करताना अधिक सक्षम होण्याची आवश्यकता आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

म्युकरमायकोसीस हा कोविडमधील औषधांमुळे होणारा आजार आहे. यासाठी याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. याकरिताच माझा डॉक्टर ही संकल्पना महत्वाची आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. रत्नागिरी जिल्हयात रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटर आणि मोठया प्रमाणावर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास जिल्हा पूर्णपणे तयार आहे असे पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी आपल्या भाषणात सांगितले.

सुपर स्पेशालिटी रुग्णालय
तळकोकणात मुंबई गोवा महामार्गावर सूपर स्पेशालिटी हॉस्पीटल असावे अशी मागणी खासदार विनायक राऊत व आमदार राजन साळवी यांनी केली. यासाठी जागाही उपलब्ध असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर असा प्रस्ताव आपण आणावा, याबाबत जरुर सकारात्मक भूमिका ठेवून रुग्णालय होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

बालकांसाठी स्वतंत्र रुग्णालय
तिसऱ्या लाटेत बालकांना धोका अधिक आहे. याचा विचार करुन बालकांसाठी 50 खाटांचे स्वस्तिक रुग्णालय त्या व्यवस्थापनाने उपलब्ध करुन दिले आहे. येथे सर्व खाटांना ऑक्सीजन सुविधा तसेच व्हेंटीलेटर सुविधेसह स्वतंत्र असा अतिदक्षता कक्ष असणारे रुग्णालय येत्या 8 दिवसात आम्ही सुरु करीत आहेत असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले.

माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या माध्यमातून जिल्हयात घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात 2000 पेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावात साधारण 1000 खाटा संस्थात्मक विलगीकरणासाठी तयार होतील अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.

जिल्हयात असणाऱ्या आरोग्य स्थितीचा आढावा त्यांनी आरंभी सादर केला. शेवटी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापुरकर, उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे, उपजिल्हाधिकारी राजश्री मोरे आदि उपस्थित होते.

असे आहे रुग्णालय…
आज लोकार्पण झालेला महिला रुग्णालयाचा टप्पा 2 एकूण 200 खाटांचा आहे. या सर्वच खाटा ऑक्सीजन सुविधेसह आहेत. कोविडची पहिली लाट आली त्यावेळी रुग्णालयातील 100 खाटांचा पहिला टप्पा समर्पित कोविड रुग्णालय म्हणून मागील वर्षापासून कार्यरत आहे. आजच्या या लोकार्पणानंतर संपूर्ण रुग्णालयाची क्षमता आता 300 खाटांची झाली आहे.
इमारतीत एकूण 3 मजले असून तळमजल्यावर 55 खाटा, पहिल्या मजल्यावर 63 खाटा आणि दुसऱ्या मजल्यावर दोन कक्ष प्रत्येकी 41 अशा एकूण 82 खाटा आहे.

वैद्यकीय उपचार सुविधेच्या अनुषंगाने येथे व्हेंटीलेटर सह अतिदक्षता कक्ष पहिल्या मजल्यावर असून येथे 22 खाटा आहेत. तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक बाधा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यासाठी वेगळा अतिदक्षता कक्ष येथे निर्माण करण्यात आलेला आहे.

या दुसऱ्या टप्प्यात एकूण 8886.08 चौरस मीटर क्षेत्र बांधकाम झाले आहे. यासाठी 8 कोटी 26 लक्ष 23 हजार 892 रुपये इतका खर्च आलेला आहे.

ऑक्सीजन सुविधा
रुग्णसेवेत अत्यावश्यक बाब असलेल्या ऑक्सीजनच्या निर्मितीसाठी इमारतीलगत स्वतंत्र उभारणी करण्यात येत आहे. येथे मध्यवर्ती ऑक्सीजन पुरवठा व्यवस्था देखील या सोबत करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती निधीतून 1 कोटी 69 लक्ष रुपये रक्कम उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या प्रकल्पाची क्षमता 170 जम्बो सिलेंडर प्रतिदिन असणार आहे.

याव्यतिरिक्त या ठिकाणी 20 किलोलिटर साठवण क्षमता असणारा लिक्वीड ऑक्सीजन टॅंक असणार आहे.

ओणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालगत असलेल्या परिचारिका प्रशिक्षण केंद्रात 30 खाटांचे समर्पित कोविड रुग्णालय झाले आहे.या ठिकाणी व्हेंटीलेटर सह 5 खाटांचा अद्ययावत असा अतिदक्षता कक्ष आहे. ओणी येथील हे रुग्णालय आमदार राजन साळवी यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून 89 लक्ष रुपये देऊन सुरु केले आहे हे विशेष…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*