रत्नागिरी : देशाच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी रत्नागिरीतील ‘संविधान सन्मान मंचा’च्या वतीने गुरुवारी, ३० जुलै रोजी ‘राष्ट्ररक्षण मूक पदयात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे.
‘नीट’ परीक्षेच्या मुद्द्याचे कारण सांगून देशात अराजकता निर्माण करणे आणि देशाच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचवणाऱ्या विविध कृतींचा निषेध करण्यासाठी ही मूक पदयात्रा काढली जात आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
गुरुवारी सकाळी ठीक ११ वाजता मारुती मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून या मूक पदयात्रेला सुरुवात होईल.
त्यानंतर जिल्हा रुग्णालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या पदयात्रेची सांगता होणार आहे. पदयात्रा सांगता स्थळी पोहोचल्यानंतर तिथे एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मूक पदयात्रेच्या माध्यमातून शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने नागरिकांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. तसेच राष्ट्रहित, संविधानाचा सन्मान आणि सामाजिक सलोखा राखण्याचा संदेश यातून दिला जाणार आहे.
या राष्ट्ररक्षण मूक पदयात्रेत रत्नागिरीतील सर्व नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, युवक, विद्यार्थी आणि देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संविधान सन्मान मंचाकडून करण्यात आले आहे.

