दापोली मुर्डी समुद्रकिनारी दुर्मीळ मुखवटाधारी बुबी पक्ष्याची सुटका

मुर्डी (ता. दापोली): समुद्रकिनारी वसलेल्या मुर्डी परिसरातील नागरिकांना सध्या निसर्गाच्या नव्या भेटी अनुभवायला मिळत आहेत. याच अनुषंगाने नुकताच एक दुर्मीळ समुद्री पाहुणा, मुखवटा असलेला बुबी (Masked Booby) पक्षी, मुर्डी परिसरात आढळून आला. यशस्वी रेस्क्यू ऑपरेशननंतर या पक्ष्याला निसर्गाच्या सान्निध्यात परत सोडण्यात आले आहे.

इंस्टाग्राम व्हिडिओ : https://www.instagram.com/reel/DLemXfqvlEk/?igsh=MWZsZXd0aGNoYWVkeQ==

रविवार, २८ जून २०२५ रोजी दुपारी मुर्डी येथील शेतकरी वैभव झगडे यांना त्यांच्या शेतात एक मोठा, बदकासारखा अज्ञात पक्षी थकलेल्या आणि अडचणीत असलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी तत्काळ दापोली वनविभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच वनविभाग आणि वाईल्ड अ‍ॅनिमल रेस्युअर या संस्थेचे प्रशिक्षित वन्यजीव रक्षक मनित बाईत आणि प्रतीक बाईत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पक्ष्याची शारीरिक तपासणी केली असता, तो अत्यंत थकलेला, पंख ओले आणि हालचाली मर्यादित असल्याचे आढळले. हा पक्षी दापोली परिसरात नियमित दिसणाऱ्या पक्ष्यांपेक्षा वेगळ्या रचनेचा होता.

हा मुखवटा असलेला बुबी पक्षी नियमित स्थलांतरित नसून, क्वचितच पश्चिम किनारपट्टीवर दिसतो. विशेषतः वादळ, थकवा किंवा अन्न शोधण्याच्या प्रयत्नात हा पक्षी किनाऱ्यावर येतो. पक्ष्याला काळजीपूर्वक रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तिथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची प्राथमिक तपासणी करून विश्रांती दिली. या संपूर्ण प्रक्रियेत वाईल्ड अ‍ॅनिमल रेस्युअरच्या मनित आणि प्रतीक यांनी तांत्रिक कौशल्य आणि दक्षतेने काम केले.

संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास, वाईल्ड अ‍ॅनिमल रेस्युअर आणि दापोली वनविभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांनी या दुर्मीळ पक्ष्याला आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षितपणे सोडण्यात आले. पक्ष्याने पुन्हा पंख पसरवून समुद्राच्या दिशेने उड्डाण केले, तेव्हा उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना उमटली.

हा परदेशी समुद्री पक्षी सामान्यतः हिंद महासागर, प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागरातील दुर्गम बेटांवर आढळतो. भारतात हा पक्षी स्थलांतरित म्हणून क्वचित दिसतो, विशेषतः अंदमान-निकोबार किंवा पश्चिम किनारपट्टीवर. वादळानंतर किंवा अन्न शोधताना चुकून किनाऱ्यावर पोहोचलेल्या या पक्ष्याच्या दुर्मीळ नोंदी आहेत.

अशा कोणत्याही वन्यजीवाच्या दर्शनाची माहिती मिळाल्यास, नागरिकांनी वाईल्ड अ‍ॅनिमल रेस्युअर किंवा दापोली वनविभाग यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*