दापोली : विवाहित असल्याचे लपवून दापोलीतील तरुणाने २० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार सागर सुरेश जाधव (३२ रा. नवशी, ता. दापोली) याच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४ (२) (डी), ६९, ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास दापोली पोलीस उपनिरीक्षक जे. एच. चव्हाण करत आहेत.
तरुणीने तक्रारीत म्हटलेले आहे की, मोबाईल दुकानात काम करणारा सागर जाधव याच्याशी ओळख झाल्यानंतर त्याच्याशी आपले बोलणे होत असे. एक दिवस सागरने माझ्या बैंक खात्याचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे बँकेतून कर्ज घेतलेले पैसे तुझ्या खात्यात पाठवतो. मला जेव्हा पैसे हवे तेव्हा तू मला पैसे काढून दे, असे सांगितले. माणुसकीच्या नात्याने आपण त्यास होकार दिला. यानंतर ज्या-ज्या वेळी सागर आपल्याकडे पैसे मागत होता तेव्हा आपण त्याला आपल्या खात्यातून पैसे काढून देत होतो. यामुळे आपली त्याच्याशी मैत्री वाढली. एक दिवस त्याच्या मोबाईलला रेंज नाही असे कारण देऊन त्याने आपला मोबाईल घेतला.
त्यानंतर सागरने मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझ्याबरोबर लग्न कर नाहीतर मी माझ्या मोबाईलमध्ये असलेले तुझे अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी दिली. यावेळी माझे फोटो तुझ्याकडे कसे आले असे विचारले असता त्याने आपल्या मोबाईलमधून फोटो परस्पर घेतले असल्याचे सांगितले. हा प्रकार कोणाला सांगितला तर अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल करून तुझ्या कुटुंबाला ठार मारेन अशी धमकी तो वारंवार देत होता. या प्रकाराने आपण खूप घाबरले. हा प्रकार आपण घरात कोणालाही सांगत नव्हतो. त्यानंतर त्याने आपण बाहेर जाऊन लग्न करूया असे आपल्याला सांगितले. सागरच्या धमकीला घाबरून मी त्याच्याबरोबर जाण्यास तयार झाले. ६ जुलै रोजी सागर आपल्याला दापोलीतून मुंबई येथे घेऊन गेला. बोरिवली मुंबई येथे एका हॉटेलमध्ये माझ्या मनाविरुद्ध दोनवेळा शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर सागर याने पुन्हा धमकी देत आपल्याला बोरिवलीवरून दिल्ली येथे एका खासगी बसने नेले. यावेळी तेथे सागरने एक फ्लॅट पाहिला होता. तेथे आपण थांबलो. परंतु त्याच दिवशी फ्लॅटच्या मालकाने आम्ही आंतरधर्मीय असून अविवाहित आहोत असे समजताच आपल्याला फ्लॅट रिकामा करण्यास सांगितले. यानंतर सागरने एका हॉटेलमध्ये रूम बुक केली. तेथे आपल्याला दोन दिवस ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी सागरने आपल्याला उठवून आपल्याला आता लग्न करायचे आहे. तू नाही बोललीस तर तुझे फोटो व्हिडिओ व्हायरल करेन व तुला बदनाम करेन अशी धमकी देत लग्न लावले. आपले लोकेशन समजू नये म्हणून सागर आपल्याला जबरदस्तीने मुंबई ते दिल्ली तसेच दिल्ली ते मुंबई असा वारंवार प्रवास करवत होता, असे पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलेले आहे. यानंतर आपली तब्येत खराब झाली. १९ जुलै ते १९ ऑगस्टपर्यंत सागर व आपण ठाणे रेल्वे स्थानक, तर कधी मुंबई सीएसटी रेल्वे स्थानक, कधी दादर रेल्वे स्थानक येथे राहिलो. २० ऑगस्ट रोजी आपली तब्येत जास्तच बिघडली म्हणून सागरने आपल्याला जिल्हा रुग्णालय ठाणे येथे दाखल केले.
सदर हॉस्पिटलमध्ये सागरने आपली प्रेग्नेंसी टेस्ट करायला सांगितली. परंतु आपली प्रेग्नेंसी टेस्ट निगेटिव्ह आली. आपल्यावर उपचार करून २३ ऑगस्ट रोजी हॉस्पिटलमधून सोडून देण्यात आले. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर सागर आपल्याला म्हणाला की, आता आपण माझ्या घरी जाऊ. कारण तुझी तब्येत ठीक नाही. यावर २४ ऑगस्ट रोजी खेड येथे रेल्वेने घेऊन आला. येथे पोहोचल्यावर सागरने खेड-दापोली बसमध्ये आपल्याला बसवले.
यावेळी त्याने सांगितले की, माझे ८ वर्षांपूर्वी सिद्धी सोबत लग्न झालेले आहे. मी तिला वाऱ्यावर सोडू शकत नाही. मी तुझी जबाबदारी घेऊ शकत नाही. तू तुझ्या मार्गाने जा, मी माझ्या बायकोसोबत घरी राहणार आहे. यावेळी आपण सागरला मी आता जाणार कुठे? मला माझ्या घरातील लोक मला घेणार नाहीत. मलाजीव देण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही असे सांगितले. तेव्हा सागर म्हणाला की तुला जे करायचे ते कर मी तुला सांभाळू शकत नाही, असे म्हणून तो तिथून निघून गेला, असे तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे.