रामदास कदम यांचा ‘शिवसेना नेते’ पदाचा राजीनामा

मुंबई : कोकणाची मुलुख मैदानी तोफ माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. या पत्रामध्ये त्यांनी अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्षामध्ये नेते पदाला किंमत राहिली नाही, असं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे.

त्याचबरोबर माझा मुलगा आमदार योगेश कदम आणि मला देखील सातत्याने अपमानीत केलं गेलं, असंही त्यांनी आपल्या पत्रात सांगितलं आहे.

रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या राजीनामा पत्रामध्ये म्हटलं आहे ते खालील प्रमाणे,

प्रति,
सन्माननीय श्री. उध्दवजी ठाकरे,
यांसी
जय महाराष्ट्र !

शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहीली नाही, हे मला पहायला मिळालं.

आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले.

विधानसभेच्या निवडणूकीच्या आधी आपण मला आचानक मातोश्रीत बोलवून घेतले आणि मला आदेश दिलेत की, यापुढे तुमच्यावरती कोणीही कितीही टिका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मिडीयासमोर अजिबात जायचे नाही. मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही, यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही. मागील ३ वर्षापासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करित आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे.

२०१९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार बनवत होतात. त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की, शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत संघर्ष केला व हिंदुत्व टिकवलं. राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल. अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही याचेही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. आणि म्हणून मी आज “शिवसेना नेता ” या पदाचा राजीनामा देत आहे.

आपला,
रामदास कदम

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*