राजेश सावंत यांची रत्नागिरी दक्षिण भाजप जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीने (भाजप) रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत यांची पुन्हा एकदा निवड केली आहे. मंगळवारी (१३ मे) पक्षाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा केली, त्यात सावंत यांच्यावर पुन्हा विश्वास टाकत त्यांच्या अनुभवी नेतृत्वाला पसंती दिली गेली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय रणनीतीकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

भारतीय जनता पार्टीने (भाजप) रत्नागिरीसह राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा मंगळवारी केली.

रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत यांची फेरनिवड करण्यात आली आहे, तर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सतीश मोरे यांना संधी देण्यात आली आहे.

उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सतीश मोरे यांच्या रूपाने नव्या चेहऱ्याला संधी मिळाली आहे. दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकांनी जोरदार तयारी केली होती. नव्या चेहऱ्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती.

मात्र, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांचा विचार करून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनुभवी आणि दांडगा राजकीय अनुभव असलेल्या राजेश सावंत यांच्यावर पुन्हा जबाबदारी सोपवली.

यापूर्वी दक्षिण रत्नागिरीत तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवेळीही बहुतांश ठिकाणी जुन्याच चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती.

रत्नागिरीसह इतर जिल्ह्यांमध्येही नव्या जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत, रायगड उत्तर जिल्हाध्यक्षपदी अविनाश कोळी, तर रायगड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी धैर्यशील पाटील यांची निवड झाली आहे.

याशिवाय, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्षपदी दीपक बाळा तावडे, उत्तर पूर्व मुंबईसाठी दीपक दळवी आणि उत्तर मध्य मुंबईसाठी वीरेंद्र म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपने राज्यातील ५८ जिल्ह्यांमध्ये नवे जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*