काजू बी साठी तातडीने हमीभाव जाहीर करा, राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: काजू बी चे दर घसरल्यामुळे कोकणातील शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या 100 ते 110 रूपयांपर्यंत ‘काजू बी’ला दर मिळत आहे. शेतकऱ्यांचा या मुळे प्रचंड नुकसान होत आहे. कोकणातील काजू शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काजू बी ला हमी भाव देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.

राज ठाकरे यांनी पत्रात काय लिहिले आहे ते पाहुया,

विषय: काजू बी साठी तातडीने हमीभाव जाहीर करण्याबाबत…..

महोदय,
काजू उत्पादक शेतकरी प्रचंड कष्ट करून आपल्या काजू बागायती फुलवत आहेत, यंदाच्या हंगामात अवकाळी पाऊस, निसर्गाचे बदलते वातावरण, वाढती मजुरी, पाडलेला आंबा-काजूचा दर आणि अति उष्णता झाल्याने काजू व आंबा व पीक धोक्यात आले आहे. तरीही या सर्वांशी संघर्ष करत कोकणातला स्वाभिमानी शेतकरी उभा आहे. नैसर्गिक आपती शेतकऱ्यांवर आली असल्यामुळे उत्पादन खर्चा पेक्षा कमी दराने काजू विक्री करणे आर्थिक तोट्याचे ठरत आहे.

दापोली कृषी विद्यापीठाने काजू ‘बी’ चा उत्पादन खर्च हा प्रतिकिलो १२२ रुपये ५० पैसे काढला आहे. परंतु,

कोकणातील काजू बागायतदार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चा एवढाही काजूला दर मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. सध्या कोकणामध्ये काजूचा दर प्रतीकिलो ११०/- रुपयांपर्यंत घसरला आहे. शेजारच्या गोवा राज्याने काजूला १५० रुपये हमीभाव दिला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडूनही चांगला हमीभाव मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. काजू प्रक्रिया कारखानदार आणि व्यापारी यांची दर ठरविण्याची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शासनाने हमीभाव ठरवून देण्याची आग्रही मागणी केली जात आहे. महाराष्ट्र शासनाने १५० रुपयांपर्यंत काजूला हमी भाव मिळवून दिला पाहिजे. आयात केलेल्या काजू-बीवर प्रक्रिया करून कोकणातील जी. आय. मानांकनाच्या नावाखाली तो खपविण्याचा प्रकार सुरू आहे. त्यालाही शासनाकडून आळा घातला जात नाही. त्यामुळे दर घसरणीवरून काजू उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे. काजू उत्पादनाचा हंगाम सुरू झाल्यावर हमी भाव मिळवून देण्याची लोकप्रतिनिधींना जाग येते. महाराष्ट्र शासनाकडून काजू उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून देण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करावे व कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा हि विनंती.
आपला नम्र,

आता सरकार यावर काय निर्णय घेतं हे पहावं लागेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*