दापोली : दापोली कृषी महाविद्यालयातील ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थिनींच्या मृदगंध व कृषी सखी गटाने दापोली तालुक्यातील किन्हळ गावात श्री खांणजाई देवी मंदिरात कृषी तंत्रज्ञान मेळाव्याचे आयोजन केले होते.
या मेळाव्या दरम्यान कृषी अभियांत्रिकी विभाग विषय विशेषज्ञ डॉ. एस. व्ही. पाठक (कृषी महाविद्यालय, दापोली) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या मेळाव्यात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत विकसित केलेल्या कृषी अवजारे व यंत्रे यांचे प्रदर्शन करण्यात आले.
यामध्ये पंकज चिखलणी अवजार, अंकुर दातेरी फावडा, स्वस्तिक अवजार, सुलभ समतलरेषा आरेखन यंत्र, कोनोविडर (शंकु कोळपे), खणती, नूतन आंबा झेला, अतुल चिकू झेला, अमर बांडगुळ कटर, नारळ सोलणी यंत्र, वैभव विळा यांचा समावेश करण्यात आला होता.
याबरोबरच भातशेती यांत्रिकीकरण या विषयावर डॉ. एस. व्ही. पाठक यांचे उपस्थित शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
त्यासोबतच पारंपरिक भात शेतीपद्धती आणि आधुनिक भातशेती पद्धती यामधील फरक चलचित्राद्वारे दाखविण्यात आला.
या कार्यक्रमासाठी विषय विशेषज्ञ डॉ.महेश कुलकर्णी, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण झगडे यांनी देखील विशेष उपस्थिती दर्शवली. या मेळाव्याला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या मेळाव्यानंतर मृदगंध गटाच्या विद्यार्थिनींनी नूतन आंबा झेला, अतुल चिकू झेला, अमर बांडगुळ कटर यांचे प्रात्यक्षिक हनुमानवाडी, किन्हळ येथे दाखवले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मृदगंध गटाच्या निकिता पिलाने, निष्ठा कुवेसकर, मेधावी शिंदे, सिमंतीनी पाटील, मृणाल मेटिल, जान्हवी कारंडे, त्रिवेणी जाधव, वेदिका भोळे, कल्याणी आगवणे तसेच कृषीसखी गटाच्या श्रेया शिंदे, विद्या बोंदर, प्रार्थना गुरव, हृतिका तार्माळे, शामल दुधाळ, श्रावणी मोरे, श्रुती विदे, संपदा सस्ते यांचा सहभाग होता.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. आनंद मयेकर, केंद्र प्रमुख डॉ. जगदीश कदम, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे, डॉ. मंदार पुरी, डॉ. आशिष शिगवण यांचे मार्गदर्शन लाभले.