रत्नागिरी:- विजबिल वसुलीसाठी पोलीस बळाचा वापर करण्याचे जाहीर करुन आपण हुकुमशहा आहोत, हे महाविकास आघाडी सरकारने दाखवून दिले आहे.

वसुलीसाठी दंडुकीशाहीचा वापर केल्यास महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता आणि भाजप रोखठोक उत्तर देईल, असा इशारा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीनंतर आमदार लाड पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी पेट्रोल, डिझेल वाढीसह राज्यातील विजबिल वसुलीबाबत सरकारकडून घेतलेल्या भुमिकेचा समाचार घेतला.

ते म्हणाले, कोरोना कालावधीत अनेकांना परिस्थिती अभावी विजबिल भरता आलेले नाही. थकित बिले वसुलीसाठी सरकारने पोलिसी बळाचा वापर करुन असे जाहीर केले आहे. यातून आपले सरकार हुकुमशहा आहे, हे दाखवून देतेय.

ही बिले पोलिसांनाही आली आहेत. त्यामुळे पोलिस त्यांना असे संरक्षण देतील का. सामान्य जनतेला दंडुकेशाही दाखवून वसुली केली जात असेल तर तो अन्याय आहे. याचे उत्तर जनताच देईल.

सामान्यांवर असा दंडुका मारणार असतील तर भाजप फक्त रोखठोक वाचून नव्हे तर प्रत्यक्षात रोखठोक उत्तर देण्यासाठी आंदोलन करेल.