मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला कठोर इशारा दिला आहे.

अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) प्रकरणात कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई न करता थेट बडतर्फ करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शनिवारी पार पडलेल्या महाराष्ट्र पोलीस परिषदेत विविध विषयांवर चर्चा झाली.

या चर्चेची माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की,

“परिषदेत देशात नव्याने लागू झालेल्या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीचे सादरीकरण झाले. तसेच सायबर प्लॅटफॉर्मचे सादरीकरण झाले. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये जलद गतीने आरोपपत्र न्यायालयात सादर करण्याबाबत चर्चा झाली. अमली पदार्थ प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्याला त्वरित बडतर्फ केले जाईल.”

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले,

“उद्योगांना कोणताही त्रास होऊ नये तसेच महिला अत्याचार प्रकरणात वेळेत आरोपपत्र दाखल व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचे नियमितपणे निरीक्षण केले जात आहे. नवीन कायद्यात गुन्ह्यात जप्त केलेली लोकांची संपत्ती परत करण्याची तरतूद आहे, त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. सहा महिन्यांत लोकांचा मुद्देमाल परत मिळायला हवा, जेणेकरून पोलीस ठाणी मोकळी होतील.”

संतोष देशमुख हत्याप्रकरणी बोलताना फडणवीस म्हणाले की, पोलीस सुरुवातीपासून कठोर तपास करत आहेत.

संपूर्ण पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.