9 जण अटकेत, ७ कोटी १५ लाख रुपयांच्या १५१ गाड्या हस्तगत
पनवेल : बीएस-४ च्या मारुती कंपनीच्या वाहनांना विक्री बंदी असतानाही या वाहनांची बनावट कागदपत्रे बनवून ती कागदपत्रे वेगवेगळ्या ठिकाणी विकणाऱ्या ९ जणांच्या टोळीला गुन्हेमध्यवर्ती शाखेने गजाआड केले असून त्यांच्याकडून जवळपास ७ कोटी १५ लाख रुपये किमतीच्या १५१ गाड्या हस्तगत केल्या आहेत.
या टोळीने बनावट चेसिस नंबर तयार करण्यासाठी वापरलेली मशिन, गाड्यांचे व्यवहार, नोंदणी, विक्रीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तयार करण्याकरीता वापरलेले लॅपटॉप, प्रिन्टर, स्टॅम्प पेपर, रबरी शिक्के, बनावट इन्व्हाईस, मोबाईल फोन इत्यादी मुद्देमाल या टोळीकडून हस्तगत करण्यात आले आहे.
पनवेलमध्ये ७ कोटी १५ लाख किंमतीच्या गाड्या हस्तगत बीएस- ४ इंजिन असलेल्या वाहनांमुळे प्रदुषणात वाढ होत असल्याने भारत सरकारने वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मार्च २०२० पासून बीएस-४ इंजिन असलेल्या वाहनांना बंदी घातली आहे.
शासनाने बंदी केलेल्या मारुती कंपनीच्या सीयाज, ब्रिजा, सेलेरीओ, वॅगनार, इको, बलेनो, एस क्रॉस, अशा वेगवेगळ्या मॉडेलच्या कार पुराच्या पाण्यामध्ये बुडाल्यामुळे या कार मारुती कंपनीने भंगार म्हणून लिलावात काढल्या होत्या. यातील ४०७ कार चेंबूर येथील ऑटोमोटीव्ह मॅन्युफॅक्चर्रस प्रा.लि. या कंपनीने भंगार म्हणून लिलावात विकत घेतल्या होत्या. मारुती कंपनीने ह्या कार ताब्यात देण्यापूर्वी सर्व कारच्या चेसीस नंबर कट करुन आरोपी आनम आस्लम सिध्दीकी (४२) याच्या ताब्यात स्क्रॅप करण्यासाठी दिल्या होत्या. मात्र आनम सिध्दीकी व त्याच्या इतर साथीदारांनी या कार स्क्रॅपमध्ये न काढता त्या कारवर पुन्हा बनावट चेसीस नंबर टाकले.
तसेच जुन्या रजिस्टर झालेल्या गाड्यांचे इंजिन नंबर व चेसीस नंबरचे बनावट व खोटे कागदपत्र तयार केले. त्यानंतर या टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे या कारचे वेगवेगळ्या राज्यातील आरटीओ कार्यालयात वेगवेगळ्या ग्राहकांच्या नावाने नोंदणी देखील केली. त्यानंतर या टोळीने मुंबई- गोवा महामार्गावरील शिरढोण भागात कार्यालय थाटून या कार पुराच्या पाण्यात खराब झाल्याचे ग्राहकांना खोटे सांगून या कारची २ ते ३ लाखांमध्ये विक्री करण्यास सुरुवात केली. तसेच अनेकांकडून या टोळीने रोख रक्कम देखील स्वीकारली.
याबाबतची माहिती गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाला मिळाल्यानंतर आरोपी आनम अस्लम सिध्दीकी ( ४२), शाबान रफिक कुरेशी (३२), मनोहरप्रसाद व्यंकटराव जाधव ( ३१), वसीम मोहम्मद उमर शेख (३१) या चौघांना पनवेल येथून अटक केली. त्यानंतर गौरव सुभाषचंद्र देम्बला (३२) आणि प्रशांत एस. नरसय्या शिवरार्थी (२६) या दोघांना दिल्ली व हैदराबाद येथून तसेच राशीद खान अहमद खान (४२), चंद्रशेखर ज्ञानदेव गाडेकर (३१) या दोघांना पनवेलमधून तर इमरान युसूफभाई चोपाडा (३८) याला गुजरातमधील अहमदाबाद येथून अटक केली आहे.