दापोली : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित दापोली तालुक्यातील वाकवली येथील पद्मश्री अण्णासाहेब बेहरे कनिष्ठ महाविद्यालयाने शाळा सिद्धी मूल्यांकन व प्रमाणीकरण तपासणीत ‘अ’ श्रेणी मानांकन प्राप्त करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमार्फत केले जाणारे ज्ञानदानाचे काम हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केले जात असून त्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची तपासणी ही श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने नियुक्त केलेल्या समितीमार्फत केली जाते.

दिनांक २२ व २३ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या या तपासणीसाठी पथक प्रमुख म्हणून राजर्षी शाहु महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बी. जे. सावंत व सदस्य म्हणून प्रा. एस्. एम्. साळोखे व प्रा. आर. ए. परीट यांनी काम पाहीले.

तसेच विद्या समितीमधील अ सदस्य म्हणून विवेकानंद कॉलेज कोल्हापूरचे प्राध्यापक  डॉ. डी. आर. पंडीत यांनी शाळासिध्दी मुल्यांकन व प्रमाणिकरणाचे काम पाहीले.

या पथकाने महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, अध्यापनाची गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि शिक्षकांचे योगदान यांचे सखोल निरीक्षण केले.

तपासणीअंती पथकाने महाविद्यालयाच्या वर्ग व्यवस्थापन, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा दर्जा अत्यंत उत्तम असल्याचे मत व्यक्त केले.

या यशाचे श्रेय प्राचार्य अरुण आप्पाणा सिदनाईक यांच्या नेतृत्वाला आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांना देण्यात आले आहे.

प्राचार्य सिदनाईक यांनी सांगितले की,

“विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा आमचा मुख्य उद्देश आहे. यासाठी आम्ही शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सहशालेय उपक्रम, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देतो. शाळा सिद्धी मूल्यांकनात ‘अ’ श्रेणी प्राप्त होणे हे आमच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.”

या यशात सुनिता संभाजी थोरात (M.A., B.Ed., भूगोल), रविंद्र देवराम बोटे (M.A., B.Ed., हिंदी), हेमराज महादू महाले (M.A., B.Ed., अर्थशास्त्र), अफरोज मुराद पटेल (M.A., M.Ed., इंग्रजी) आणि किर्ती किरण कोलप (एम.ए.बी.एड. इतिहास) यांच्यासह सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील प्रशासकीय आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करून या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर ही गेल्या अनेक दशकांपासून शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे. संस्थेच्या विविध शाखांमार्फत ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण प्रदान केले जाते. संस्थेचे ध्यय केवळ शैक्षणिक यश मिळवणे नसून, विद्यार्थ्यांना सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि सक्षम नागरिक बनवणे आहे. या ध्येयाला अनुसरून वाकवली येथील पद्मश्री अण्णासाहेब बेहरे कनिष्ठ महाविद्यालयाने विविध उपक्रम राबवले, जसे की पर्यावरण संवर्धन मोहिमा, करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आणि स्थानिक समुदायासोबत संनाद.

वाकवली कनिष्ठ महाविद्यालयाच्या या उत्कृष्ट यशाबद्दल वाकवली पंचक्रोशीतील नागरिक, पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. शाळा व्यवस्थापन समितीने महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

शाला सिद्धी मूल्यांकनात ‘अ’ श्रेणी प्राप्त करणे हे केवळ एक प्रमाणपत्र नाही, तर महाविद्यालयाच्या गुणवत्तेची आणि समर्पणाची पावती आहे. हे यश ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरेल.

विशेषतः, दापोलीसारख्या तालुक्यातील वाकवली येथे अशा प्रकारचे यश मिळणे हे स्थानिक समुदायासाठी अभिमानास्पद आहे.

या मानांकनाने महाविद्यालयाने आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, भविष्यात आणखी उंच भरारी घेण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे.