ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या खात्याने मंजूर केला निधी

दापोली : कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत दापोली तालुक्यातील उत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून सन्मानित झालेल्या  कर्दे गावच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल १४,०२,४९,०४१/- (रु. चौदा कोटी दोन लाख एकोणपन्नास हजार एकेचाळीस फक्त) इतक्या रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ग्रामविकास व पंचायत राज राज्य मंत्री ना. योगेश कदम यांच्या अखत्यारीतील ग्रामविकास खात्याने ही मंजुरी दिली आहे.

ना. योगेश कदम, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री

सर्वसमावेशक भूमिका घेत मंत्री योगेश कदम यांनी या विकासकामांसाठी विशेष पुढाकार घेतला, ज्यामुळे कर्दे गावच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. कर्दे गावचे सरपंच सचिन तोडणकर यांनीही नंतर योगेश कदम यांचे आभार मानले आहेत.

कोकणातील निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कर्दे गावाच्या विकासासाठी मंजूर झालेल्या या निधीतून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता सुविधा, पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा तसेच स्थानिक संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाशी निगडित अनेक प्रकल्प राबवले जाणार आहेत.

या प्रकल्पांमुळे गावातील पर्यटनाला नवसंजीवनी मिळेल आणि स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी आशा व्यक्त होत आहे. कोकणाच्या विकासासाठी मंत्री योगेश कदम यांची कटिबद्धता या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

सरपंच सचिन तोडणकर यांनी व्यक्त केले आभार

कर्दे गावचे सरपंच यांनी माय कोकणशी बोलताना या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे. नामदार योगेश कदम यांनी कशाप्रकारे यामध्ये पुढाकार घेऊन निधी मंजूर केला हे सांगितलं आहे. ते असं म्हणाले की,

सचिन तोडणकर, सरपंच (कर्दे)

“आमचं कर्दे गाव गाव पर्यटनासाठी निवडलं गेलं, याचा आम्हाला खूप आनंद आहे. पण हे यश आम्हाला राज्य मंत्री योगेश दादा कदम यांच्यामुळे मिळालं. आम्ही २०१५ पासून कोकण ग्रामीण पर्यटन प्रकल्पावर काम करत होतो आणि तेव्हाच कर्दे गावासाठी आमचा आराखडा तयार झाला होता. आम्हाला गावाच्या विकासासाठी नेमकं काय हवंय, याचा स्पष्ट प्लॅन तेव्हापासून आमच्याकडे होता.पण या आराखड्याला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी राज्य मंत्री योगेश दादा कदम यांचं योगदान महत्त्वाचं ठरलं. त्यांच्या सांगण्यावरून अलीकडेच आम्ही प्रेझेंटेशन सादर केलं. त्यांनी आमचा तयार आराखडा पाहिला आणि त्याला चालना दिली. त्यांच्या पुढाकारामुळे या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली. आज कर्दे गावाचा विकास होतोय, आणि याचं संपूर्ण श्रेय राज्य मंत्री योगेश दादा कदम यांना जातं. त्यांच्या या दूरदृष्टी आणि प्रयत्नांमुळे आमच्या स्वप्नांना बळ मिळालं, आणि आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत.”

मंजूर कामांचा तपशील:

  • कर्दे खाडी येथे संरक्षक बंधारा: रु. ३,७९,२७,०००/-
  • कर्दे खाडीवर पूल बांधकाम: रु. १,५०,३३,९००/-
  • दुकाने व फेरिवाले झोन: रु. ३६,००,०००/-
  • साहसी क्रीडा उद्यान: रु. ४५,००,०००/-
  • पर्यटक माहिती केंद्र: रु. १,२५,००,२८०/-
  • जलक्रीडा उपकरणांसाठी स्टोरेज केंद्र: रु. ३०,००,०००/-
  • आरसीसी वॉच टॉवर: रु. ३०,००,०००/-
  • तरंगती जेट्टी: रु. २५,००,०००/-
  • समुद्र किनाऱ्यालगत सांस्कृतिक संकुल: रु. २,८९,०६,८६१/-
  • दिशादर्शक फलक: रु. ५,००,०००/-
  • खेम मंदिर सुशोभीकरण: रु. २५,००,०००/-
  • कर्दे ते खेम मंदिर रस्ता: रु. ४५,३१,०००/-
  • कर्दे ते गिम्हवणे रस्ता: रु. १,३०,००,०००/-
  • कर्दे जाधववाडी रस्ता: रु. १५,००,०००/-
  • स्वयंचलित फूड कंपोस्टर व प्लास्टिक श्रेडिंग मशीन: रु. ४७,५०,०००/-
  • मोबाईल टॉवर: रु. २५,००,०००/-

एकूण खर्च: रु. १४,०२,४९,०४१/-

या प्रकल्पांमुळे कर्दे गावच्या पर्यटनाला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. मंत्री योगेश कदम यांच्या प्रयत्नांचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे.

लवकरच सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून या कामांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.