दापोलीच्या आंजर्ले समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासव पिल्लांचा महोत्सव सुरू

दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या जन्माचा उत्साहपूर्ण महोत्सव गुरुवार, 10 एप्रिलपासून सुरू झाला आहे.

10 एप्रिल ते 10 मे या कालावधीत हा महोत्सव पर्यटक आणि स्थानिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

पहिल्याच दिवशी सकाळी पर्यटक आणि स्थानिकांच्या उपस्थितीत पाच ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. या सोहळ्याने महोत्सवाचा शुभारंभ झाला.

एप्रिल आणि मे महिन्यांत समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते.

अशा वेळी आंजर्ले किनाऱ्यावर कासवांच्या पिल्लांच्या जन्माचा आनंद पर्यटकांना अनुभवता येत आहे. कासव बचाव मोहिमेअंतर्गत संवर्धन करण्यात आलेल्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे.

यंदाच्या हंगामात आंजर्ले किनाऱ्यावर 43 कासवांची घरटी आढळली असून, त्यातील 6,490 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत.

कासव महोत्सवात संवर्धित अंड्यांमधून बाहेर येणारी कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्याचा क्षण पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरत आहे.

गुरुवारी पिल्ले समुद्रात सोडताना सरपंच मेघना पवार, उपसरपंच प्रथमेश केळसकर, कांदळवन समिती अध्यक्ष संदेश देवकर, वनरक्षक शुभांगी गुरव, सहाय्यक उपजिविका तज्ज्ञ अभिनय केळसकर, प्रकल्प सहाय्यक क्रांती मिंडे, कासवमित्र अजिंक्य केळसकर, सूजन खेडेकर, सुयोग मयेकर आणि पर्यटक उपस्थित होते.

हा महोत्सव कासव संवर्धनाबरोबरच पर्यटनाला चालना देणारा ठरत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*