रत्नागिरी : बाजार समिती शेतमालाच्या गाड्या अडवून बेकायदेशीर दंड आकारणी करत आहे. हे लगेच थांबलं नाही तर रत्नागिरी बाजार समितीचे कार्यालय फोडून टाकू असा कडक इशारा, माजी खासदार व भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी बाजार समितीला दिला आहे.
या संदर्भात निलेश राणे यांनी एक ट्विट केले असून, ते यामध्ये म्हणतात की,
रत्नागिरी बाजार समितीने शेतकऱ्यांवर दरोडा टाकण्याचा नवा मार्ग शोधलाय. शेतमालाच्या गाड्या अडवून शेतकऱ्यांना दंडाच्या पावत्या दिल्या जात आहेत. बाजार फीच्या नावाखाली या पावत्या दिल्या जात असून, आमचे बीजेपी चे सहकारी पोलीस तक्रार करत आहेत. हे लगेच थांबलं नाही तर रत्नागिरी बाजार समितीचे ऑफिस फोडून टाकू.
रत्नागिरी बाजार समितीमध्ये होणाऱ्या अशा प्रकारच्या बेकायदेशीर कामामुळे शेतकऱ्यांना नेहमीच त्रास झाला आहे. काही वर्षांपूर्वी मच्छी वाहतुकीवर देखील अशा प्रकारे वसुली केली जात होती.
त्यावेळी देखील निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांचे बाजार समिती लक्ष बनले होते. त्यावेळी केलेल्या आंदोलनामुळे अखेर बाजार समितीने मच्छी वाहतुकीवरील आकारण्यात येणारा दंड वसूल करणे बंद केले होते.
त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या रत्नागिरी बाजार समितीच्या अडचणी वाढणार असून शेतमालावर आशा प्रकारे कर किंवा दंड आकारणे बेकायदेशीर असल्याने समितीने ते तत्काळ थांबिवले नाही तर पुन्हा समिती लक्ष ठरणार, हे माजी खासदार निलेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यावरून दिसून येत आहे.