दापोली : येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय १७ वर्षांखालील वयोगटाच्या क्रिकेट स्पर्धेत नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत विजेतेपदावर मोहोर उमटवली.
अंतिम सामन्यात नॅशनल हायस्कूलच्या खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर दर्जेदार सांघिक खेळ करत दापोलीच्याच ए. जी. हायस्कूल संघावर दणदणीत मात केली.
खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत दाखवलेल्या आत्मविश्वासपूर्ण खेळामुळे नॅशनल हायस्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील यशाच्या आलेखात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे.
या घवघवीत यशाबद्दल विजयी संघातील सर्व खेळाडूंचे आणि त्यांना मोलाचे मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक रविंद्र कदम व संकेत चांदावडे यांचे सर्वत्र विशेष कौतुक होत आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक अय्युब मुल्ला, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंच्या या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले.
याशिवाय, मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार, सचिव इकबाल परकार आणि ज्युनिअर कॉलेज समितीचे अध्यक्ष आरिफ मेमन यांनी विजेत्या संघाचे व क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांना आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या दणदणीत विजयामुळे नॅशनल हायस्कूलच्या खेळाडूंमध्ये उत्साहाचे आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

