दापोली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी दापोली विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रप्रमुख मुजीब रुमाणे यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेवरून मोठी चर्चा सुरू झाली असून, ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ‘घरवापसी’ करणार असल्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

रुमाणे यांनी नुकताच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला असून आता ते स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

विशेष म्हणजे मुजीब रुमाणे हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच सक्रिय पदाधिकारी होते. मात्र, राज्यात घडलेल्या सत्तानाट्य आणि राजकीय उलथापालथीच्या काळात त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रचंड आग्रहाखातर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता.

ठाकरे गटात त्यांनी क्षेत्रप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली, परंतु आता पुन्हा एकदा जुन्या सहकाऱ्यांसोबत आणि मूळ पक्षात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे बोलले जात आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रुमाणे यांची ही संभाव्य घरवापसी दापोलीतील राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठी जमेची बाजू ठरू शकते, तर दुसरीकडे ठाकरे गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

त्यांच्या या निर्णयामुळे दापोली मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलण्याची चिन्हे असून, त्यांच्या या ‘घरवापसी’च्या अधिकृत घोषणेकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.