रत्नागिरी : बंद्यांचे पुनर्वसन करून त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा कारागृहात राबविण्यात आलेल्या ८० दिवसीय प्लंबिंग कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २५ बंद्यांना स्किल इंडिया प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली आहेत.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांच्या सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन यांच्या पुढाकाराने हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.

जन शिक्षण संस्थान आणि रत्नागिरी जिल्हा कारागृह प्रशासनाच्या सहकार्याने १५ जून रोजी या प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली होती.

या प्रशिक्षणासाठी एकूण २९ बंद्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या २५ जणांना २३ ऑक्टोबर रोजी आयोजित एका विशेष समारंभात प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

बंद्यांना केवळ तात्त्विक नव्हे, तर प्लंबिंगचे प्रत्यक्ष व्यावहारिक ज्ञान व कौशल्य प्राप्त करून देणे आणि कारागृहातून मुक्त झाल्यानंतर त्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सचिन पाटील, जन शिक्षण संस्थानचे अध्यक्ष तथा गुहागरचे माजी आमदार विनय नातू, निधी सावंत, अमृता शेट्ये आणि प्लंबिंग प्रशिक्षक भिकाजी नाटेकर उपस्थित होते.

तसेच फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने एस. रविंद्रन, नंदकिशोर शिंपी आणि शामराव निंबाळकर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.

यावेळी प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या बंद्यांनी कारागृह प्रशासन आणि आयोजकांचे आभार मानले. या प्रशिक्षणामुळे नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळाली असून, भविष्यात सन्मानाने आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी या प्रशिक्षणाचा मोठा उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बंद्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करणे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना पुन्हा सामावून घेण्यासाठी राबविण्यात आलेला हा संयुक्त उपक्रम सामाजिक परिवर्तनाला चालना देणारा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरला आहे.